ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने “ठाणे ग्रंथोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य ग्रंथोत्सव ३० व ३१ डिसेंबर रोजी कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेत पार पडणार आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, चांगदेव काळे यांच्यासह विविध ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याअंतर्गत आयोजित करण्यात येणारा ठाणे ग्रंथोत्सव हा सर्व साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतो. यंदाही ३० व ३१ डिसेंबर रोजी भव्य ग्रंथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सोमवार ३० डिसेंबर सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी ११ वाजता वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे. दुपारी २ ते ४ या कालावधीत भारतीय संविधान “माझा अभिमान” या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी ॲड. बाबुराव हंद्राळे, सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड. शरद मडके, माध्यम आणि विधी सल्लागार, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार डॉ.विलास पवार यांचा सहभाग असणार आहे. तर ४ वाजता “शब्दांच्या गावा जावे” हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दूरदर्शन मुंबईच्या दिपाली केळकर यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५ वाजता या कालावधीत “कथाकथन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक चांगदेव काळे असणार आहेत तर साहित्यिक आदित्य देसाई, वसुंधरा घाणेकर आणि रामदास खरे यांचा सहभाग असणार आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेत हा दोन दिवसीय उत्सव पार पडणार आहे.
हेही वाचा : नववर्ष स्वागतापूर्वी पोलीस यंत्रणा सतर्क; रेव्ह पार्ट्यांवरही पोलिसांचे लक्ष
याचबरोबर मंगळवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संगीतवर्षा कला प्रतिष्ठान प्रस्तुत “गाथा शिवकालीन इतिहासाची” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ११.३० वाजता “अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा कशी होईल?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे असणार आहेत तर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचा सहभाग असणार आहे. यानंतर दुपारच्या सत्रात “क-कवितेचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे असणार आहेत. ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे यांच्या कोळीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. तर सायंकाळी ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार करण्यात येणार आहे.