ठाणे : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी कृषी विभागाच्या मार्फत महिला बचत गटांना ‘ई – कार्ट’ पुरविण्यात आले आहेत. या वाहनाच्या मदतीने महिलांना स्वत: पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकांना करता येत आहे. यामाध्यमातून महिलांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले असून जिल्ह्यातील पाच महिला बचत गटांना प्रायोगिक तत्त्वावर हे वाहन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली.

ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी जिल्हापातळीवर केली जाते. ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमानी योजना अंमलात आणण्यात आली.

हेही वाचा – ठाणे : कोट्यवधीचे सोन्याचे दागिने कर्मचाऱ्याकडून चोरी

या योजनेअंतर्गत काही महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य पुरविले जाते. त्यानुसार, थेट लाभ हस्तांतरण या तत्त्वानुसार ठाणे जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात ही योजना प्रायोगिकरित्या राबविण्यास सुरुवात झाली. यात ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांनी केलेल्या उत्पादनांची थेट ग्राहकांकडे विक्री करता यावी यासाठी ई- कार्ट वाहनांचे वाटप केले जाते.

नुकतेच, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथमधील महिला बचत गटांना ई- कार्ट वाहनाचे वाटप करण्यात आले आहे. या वाहनांच्या माध्यमातून महिलांना स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांना विकता येत आहे. यामुळे त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून त्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य तो मोबदला मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – VIDEO : ठाण्यात वाऱ्याच्या वेगामुळे जाहिरात फलक पडण्याची भिती, पालिकेने फलक काढण्याबाबत बजावली नोटीस

या योजनेसाठी भिवंडी तालुक्यातील दोन शहापूर तालुक्यातील दोन, अंबरनाथ व कल्याण तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच महिला बचत गटांना ई – कार्ट वाहन प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत गटातील उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. या योजनेचा महिला बचत गटांना उत्तम लाभ होत आहे. – रामेश्वर पाचे, कृषि विकास अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद

‘ई कार्ट’ वाहन

‘ई – कार्ट’ वाहन हे आकाराने लहान असून त्यात भाजीपाला ठेवण्यासाठी लहान लहान कंटेनर आहेत. भाजीपाला ताजा रहावा यासाठी या वाहनात भाज्यांवर पाण्याचा फवारा करणारे यंत्रसुद्धा उपलब्ध आहे. तसेच गाडीवर ध्वनी विस्तारक यंत्रसुद्धा बसविण्यात आले आहे.