ठाणे : रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा स्वागत यात्रेच्या मार्गात बदल करण्याचा विचार आयोजकांनी केला होता. यासाठी नव्या मार्गाची पाहणीही करण्यात आली. मात्र, उन्हाचा तीव्र तडाखा आणि रविवार असल्याने अपेक्षित गर्दीचा विचार करता नव्या मार्गावरून यात्रा काढल्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता होती. त्यामुळे नव्या मार्गाचा विचार थांबवून पूर्वीप्रमाणे जुन्याच मार्गावरून स्वागत यात्रा काढण्याच्या निर्णयावर आयोजकांनी शिक्कामोर्तब केला आहे.

ठाणे शहरात गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाची यात्रा भव्य स्वरुपात काढण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यंदाच्या यात्रेते नवनविन संस्था, महाविद्यालये न्यास सोबत जोडले गेले आहेत. या यात्रेची परंपरा, प्रचार आणि प्रसार नव्या पिढीला व्हावा ठाणे शहराच्या इतर भागातील नागरिकांना देखील या यात्रेची माहिती मिळावी यासाठी आयोजकांकडून यंदाची स्वागत यात्रा नव्या मार्गावरुन काढण्याचा विचार सुरु होता. त्यासाठी त्यांनी काही मार्गांची चाचपणी केली. त्यातून श्री कौपिनेश्वर मंदिर – रंगो बापूजी गुप्ते चौक जांभळी नाका – दगडी शाळा – अल्मेडा चौक – ठाणे महानगरपालिका – उजवीकडे वळून कचराळी तलाव – पाचपाखाडी – प्रशांत कॉर्नर – आराधना टॉकीज डावीकडे वळून – हरिनिवास सर्कल – नौपाडा पोलिस स्टेशन – टेलिफोन एक्सचेंज चौक – गोखले रोड – स्वीट कॉर्नर – राम मारुती रोड – पू.ना गाडगीळ ज्वेलर्स – तलावपाळी – उजवीकडे वळून पुन्हा कौपिनेश्वर मंदिर असा नविन मार्गाचा विचार करण्यात आला. परंतू, हा मार्ग निश्चित करण्यापूर्वी आयोजकांनी स्वत: या मार्गाची तसेच किती वेळ लागतो याची पाहणी केली. त्यावेळी आयोजकांना लक्षात आले की, या मार्गावरुन स्वागत यात्रा काढली तर, जास्तीचा वेळ लागत आहे. त्यात, यंदा यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्षे आणि त्यात रविवार असल्यामुळे यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असणार आहे. नव्या मार्गामुळे स्वागत यात्रेला जास्त वेळ लागला तर,नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. नागरिकांना उन्हाच्या तडाख्याचा त्रास होऊ नये यासाठी नव्या मार्गावरुन यात्रा काढण्याचा विचार आयोजकांनी सोडला असून जुन्याच मार्गावरुन यात्रा काढली जाणार आहे.

हा आहे जुना मार्ग..

श्री कौपिनेश्वर मंदिर – रंगो बापूजी गुप्ते चौक जांभळी नाका – दगडी शाळा – श्री गजानन महाराज चौक – तीन पेट्रोल पंप – हरिनिवास सर्कल – नौपाडा पोलिस स्टेशन – टेलिफोन एक्सचेंज चौक – गोखले रोड – स्वीट कॉर्नर – राम मारुती रोड – पू ना गाडगीळ ज्वेलर्स – तलावपाळी – उजवीकडे वळून पुन्हा कौपिनेश्वर मंदिर या जुन्या मार्गावरुनच यंदाची स्वागत यात्रा निघणार आहे.

यंदा स्वागत यात्रेचा मार्ग बदलण्याचा विचार केलेला. परंतू ,वाढता उन्हाचा तडाखा बघता मार्ग बदलला तर, यात्रेला वेळ जास्त जाईल. उन्हाचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून जुन्या मार्गावरुनच यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. – संजीव ब्रह्मे, कार्याध्यक्ष, श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे.

शरद गांगल यंदाचे स्वागताध्यक्ष

यंदाच्या वर्षी नववर्षे स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल असणार आहेत. ते मानव संसाधन (एचआर) क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी थरमॅक्स कंपीनीत कार्यकारी संचालक, एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स चे महाव्यवस्थापक तसेच कॅडबरी, एशिय पेन्ट अशा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सध्या ते सिंबायोसिस या शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक परिषदेशी संलग्न आहेत. तसेच ते अभाविप चे कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक, सेवा सहयोग च्या विद्यार्थी साहाय्य योजनेचे दायित्व, सहकार भारती प्रांत पदाधिकारी अशा अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे.

Story img Loader