ठाणे : जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा यामुळे जिल्हा प्रशासनाने पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले तर, दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी आणि मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसादरम्यान अनेक झाडे उन्मळून पडली. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. परंतु दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला. गुरुवार सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही वाहत होता. तसेच हवामान विभागाने गुरूवारी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सकाळी सुट्टी जाहीर केली.

हेही वाचा…४० फिरते दवाखाने मुरबाडच्या दुर्गम भागात पडून; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या जीपही वर्षभरापासून पडून

ठाणे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार ठाणे जिल्हा परिषदेने शाळा आणि महाविद्यालय सुट्टीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश येण्यापूर्वी सकाळच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग भरले होते. त्यामुळे आदेश येताच या वर्गातील विद्यार्थांना घरी सोडण्यात आले. हे विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहचतील याची दक्षता मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच दुपार सत्रातील पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या आणि मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.