ठाणे : शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहालोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथे गुरुवारी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे काही घरांची पडझड झाली. या पडझडीत सापटेपाडा येथील त्र्यंबक पाचालकर यांचे राहते घर पडले. यात घरातील तीन जण जखमी झाले. पाड्यापासून मुख्य रस्त्या पर्यंत जाण्यास पक्का रस्ताच नसल्याने रात्री ११ च्या सुमारास जखमींना झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. मुख्य रस्त्यावरून खासगी वाहनातून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांच्या दुरवस्थेचा गंभीर विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.

ठाणे जिल्हा हा प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये उभारण्यात येत असलेले रस्ते, महामार्ग यांमुळे शहरातील वाहतूक वेगवान होत आहे. तर अत्याधुनिक रुग्णालयांच्या उभारणीमुळे शहरातील नागरिकांना अगदी काही पाउलांवर तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र याच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच रसातळाला गेली असल्याचे विविध घटनांमधून पुढे येत असते.

हेही वाचा…कल्याण : सेक्रेड हार्ट शाळेच्या संचालकाला विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी अटक

जिल्ह्याच्या याच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे आणि वाहतूक व्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकद वेशीवर टांगणारी घटना शहापूर तालुक्यात गुरुवारी रात्री घडली. शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहालोंडे अंतर्गत सापटेपाडा आहे. जेमतेम ४३ उंबरठ्यांचा हा पाडा असून पाड्याची लोकसंख्या १५५ इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून शहापूर आणि मुरबाड येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारी देखील शहापूर मध्ये रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहालोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथे काही घरांची पडझड झाली. या पडझडीत सापटेपाडा येथील त्र्यंबक पाचालकर यांचे राहते घर पडले. यात घरातील लाडक्या पाचलकर, जनी पाचालकर आणि शांता पाचालकर असे तीन जण जखमी झाले.

पाड्यापासून मुख्य रस्त्या पर्यंत जाण्यास पक्का रस्ताच नसल्याने रात्री १० च्या सुमारास या सर्व जखमींना झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले. या दरम्यान जखमींना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन तेथून खासगी वाहनातून पाड्यांपासून पाच किलोमीटर लांब असलेल्या अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र यातील जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना रात्री १२ वाजता शहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या रुग्णांवर शहापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे राज्यातील प्रगत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेही वाचा…कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

दोन किलोमीटर झोळीतून पायपीट

सापटेपाड्यापासून पाच किलोमीटर लांब अघई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र सापटेपाड्यापासून अघई येथे जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याचे हे अंतर हे दोन किलोमीटर आहे. या दोन किलोमीटरच्या अंतरावर रस्ताच नाही. यामुळे जोरदार कोसळणाऱ्या पावसात पाचलकर कुटुंबियातील जखमींना तब्बल दोन किलोमीटर पायपीट करत झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत पोहचावे लागले.

हेही वाचा…कल्याण पूर्वेत बगीचा आरक्षणावरील शिवसेनेचे लोकसभा निवडणूक कार्यालय थाटात उभे

सध्या सर्व रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील जनी पाचलकर यांना अधिक दुखापत झाली होती. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. सापटेपाडा मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी असलेल्या रस्त्याचा प्रस्ताव दिलेला आहे. रस्ता उभारण्यासाठी लागणारी जागा वनविभागाची आहे. सर्व मंजुरी मिळाल्यास रस्त्याचे काम करण्यात येईल. – वासुदेव पाटील, तलाठी, पिवळी – सावरोली खुर्द