अंबरनाथ : मी क्रिकेट खेळाडू नाही तर कबड्डीवाला आहे. कबड्डीमध्ये मेलेला गडी पुन्हा जिवंत होतो. त्याचप्रमाणे माझी पण पुन्हा इन्ट्री होणार, असे वक्तव्य प्रहारचे बच्चू कडू यांनी केले आहे. अंबरनाथ शररात प्रहार चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने कडू बोलत होते. माझावर कारवाईमुळे विरोधकांना फार लाभ मिळणार नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. कडू यांच्या वक्तव्याने अनेक तर्क लावले जात आहेत. कडू यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र कडू आता नेमके कुठे पुन्हा प्रवेश करणार आहेत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अंबरनाथमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू उपस्थित होते. बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. नुकतीच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या बच्चू कडू यांना नोटीस बजावण्यात आली आहे. एक वर्षांच्या शिक्षेच्या प्रकरणावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
विभागीय सहनिबंधक यांनी कडू यांना नोटीस पाठवून आपणास अपात्र का करू नये, याबाबत खुलासा करण्याचे आणि म्हणणे सादर करण्याचे यात नमूद करण्यात आले आहे. याच विषयावरून त्यांना माध्यमांनी छेडले असता कडू यांनी आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले. मी कबड्डी खेळाचा खेळाडू आहे. यात खेळात मृत झालेला खेळाडू पुन्हा जिवंत होतो. त्याचप्रमाणे माझी सुद्धा एन्ट्री होणार, असे कडू यावेळी बोलताना म्हणाले. कडू यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रवीण तायडे यांनी पराभव केला. पराभव झाल्यानंतर कडू यांनी अनेक वक्तव्ये केली. पराभव जिव्हारी लागल्यानंतर त्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्नही सुरू झाले. कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी वेळी साथ दिली होती. त्यानंतर त्यांनी अमरावती बँक ताब्यात घेतली होती.