ठाणे : लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हे असतानाही ठाणे, पालघर आणि तळ कोकणामध्ये लाचेचा विळखा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घट्ट पकडला आहे. त्यातही लाच घेण्यामध्ये पोलीस अव्वल ठरल्याचे कारवाईतून आढळून आले आहे. कारवाई टाळण्यासाठी, जामीन मिळवून देणे, अटक करु नये अशा विविध कारणांसाठी पोलिसांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. ठाणे लाचलुपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रचलेल्या सापळ्यांमध्ये ठाण्यासह कोकण क्षेत्रातील २१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सापळ्यात अडकले आहेत. त्यापाठोपाठ महसूल, पालिकेतील कर्मचाऱ्यांचेही लाच घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड-अलीबाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा भाग येतो. संबंधित शहरांतील शासकीय विभागात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण ६६ सापळे रचले होते. त्यामध्ये ९८ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. या सापळ्यांमध्ये सर्वाधिक कारवाया पोलिसांविरोधात झाल्या आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रात ग्रामीण आणि शहरी पोलीस असा दोन्ही भाग येतो. विभागाच्या कारवाईत एकूण २१ पोलिसांवर लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले.

गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीवरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी, दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, नियमभंग केलेले वाहन सोडविणे, जामीन मिळवून देणे अशा विविध प्रकारांमध्ये पोलिसांनी लाच मागितली होती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांत पाच हजार रुपयांपासून ते २१ लाख रुपयांपर्यंतच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांप्रमाणेच महसूल विभाग देखील लाचखोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. महसूल विभागातील १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये जमीनीचे वाद सोडविणे, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखणे अशा विविध प्रकरणांमध्ये लाच मागितली गेली आहे. पालिका, महावितरण या विभागातील शासकीय नोकरदारही सापळ्यात अडकले आहे. पालिकांचे ११ तर महावितरण विभागातील सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. तसेच वन विभाग, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यासह इतर विभागातही अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात लाचेप्रकरणी गुन्हे दाखल आहे

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक क्षेत्रात अपसंपदा बाळगल्याचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये १५ जणांवर गुन्हे दाखल आहेत. ही प्रकरणे तपासाधीन आहेत.

Story img Loader