आशुतोष डुम्बरे , सह पोलीस आयुक्त
घरात एकटेच वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठांवरील अत्याचार आणि लुटीच्या उद्देशातून त्यांची होणारी हत्या अशा स्वरूपाचे गुन्हे गेल्या काही वर्षांपासून घडू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून पोलीस परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अधूनमधून जाऊन त्यांची विचारपूस करीत आहेत. राज्यभरात अशा प्रकारचे काम सुरू आहे. असे असले तरी पोलिसांची तात्काळ मदत मिळावी म्हणून ज्येष्ठांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन नव्हती. त्यामुळे पोलीस ठाण्याचे क्रमांकआणि नियंत्रण कक्षातील क्रमांकावरच या तक्रारी नोंदविल्या जात होत्या. मात्र हे दोन्ही क्रमांक विविध कामांसाठी सातत्याने व्यस्त राहत असल्यामुळे ज्येष्ठांचा वेळेवर संपर्क होऊ शकत नव्हता, अशी मोठी अडचण होती. आता ठाणे पोलिसांनी त्यावर तोडगा काढला असून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. अशा स्वरूपाची हेल्पलाइन सुरू करणारे हे राज्यातील पहिले आयुक्तालय आहे. केवळ हेल्पलाइन सुरू करण्यापुरतेच ठाणे पोलीस मर्यादित राहिले नाही तर सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांनी ज्येष्ठांसाठी ‘कर्तव्य’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामागची नेमकी भूमिका काय आहे आणि ज्येष्ठांना त्याचा कसा फायदा कसा होऊ शकेल, या विषयी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिलेली विशेष मुलाखत..
* कर्तव्य अभियान संकल्पना पुढे कशी आली?
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांना वेगळे स्थान आहे; परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा हा एकच मुद्दा नाही तर अन्य समस्याही त्यांना भेडसावत आहेत. सन्मानाला धक्का पोहोचणे, एकटेपणाची जाणीव होणे, पोलीस सुरक्षा, आरोग्य तसेच मानसिक ताण अशा प्रमुख समस्या ज्येष्ठांना भेडसावतात. यासंदर्भात ‘आलेख’ या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली आणि त्यामध्ये त्यांनी याच मुद्दय़ावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कशा सोडविता येतील आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येऊ शकेल, याविषयावर विचारमंथन झाले. या विषयीच्या चर्चेतूनच ‘कर्तव्य’ उपक्रमाची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेची मदत घेण्यात आली. या संस्थेने उपक्रमासाठी प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीच्या आधारे शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून तसेच गृहनिर्माण संस्था व वसाहतीच्या कार्यालयांमार्फत माहिती संकलित केली जाणार आहे.
* उपक्रमाच्या कामाचे स्वरूप कसे असेल?
‘कर्तव्य’ उपक्रमासाठी शिखर आणि कार्यकारी अशा दोन समित्या तयार करण्यात आल्या आहेत. शिखर समितीमध्ये पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, आलेख संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रतिनिधी असणार आहेत तर कार्यकारी समितीमध्ये पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, ज्येष्ठ नागरिकांच्या संघाचे प्रतिनिधी, आलेखचे प्रतिनिधी आणि युवक असणार आहेत. शिखर समितीची महिन्यातून एकदा बैठक होणार असून त्यात कामाचा आढावा घेतला जाणार आहे. कार्यकारी समितीची बैठक मात्र दर आठवडय़ाला होणार असून त्यामध्ये कामाची आखणी आणि त्याचे नियोजन केले जाणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून ज्येष्ठांची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
* उपक्रमातून ज्येष्ठांना कसा फायदा होऊ शकेल?
ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या काळात तात्काळ मदत मिळावी म्हणून या उपक्रमांतर्गत १०९० हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा हा एकच मुद्दा नाही तर त्यांच्या अनेक समस्या भेडसावतात. घरात मन मोकळे करण्यासाठी दुसरे नसल्यामुळे अनेकदा ज्येष्ठांना एकटेपणाची जाणीव होते. अशा वेळी ज्येष्ठांच्या घरी पोलीस जातात आणि त्यांच्या समस्या जाणून घेतात. ज्या समस्या पोलिसांकडून सुटू शकतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आरोग्य तसेच मानसिक तणाव अशा समस्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे या उपक्रमात आता डॉक्टरांचा सहभाग वाढविण्याचा विचार आहे. तसेच शहरातील गृहसंकुलांमधील पदाधिकाऱ्यांनाही उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
* केवळ मदत पोहोचवणे हाच उपक्रमाचा उद्देश आहे का?
काही ज्येष्ठ नागरिकांना स्वजनांकडून अपमानास्पद वागणूक मिळते आणि त्यामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का पोहचतो. वेळीच जेवण न देणे, औषधोपचारांपासून वंचित ठेवणे, घरामध्ये कोंडून ठेवणे, अशा स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. मात्र मुलाबाळांच्या तसेच स्वत:च्या बदनामीच्या भीतीने ते कोणत्याही प्रकारचा विरोध करीत नाहीत आणि शारीरिक व मानसिक यातना सहन करत उरलेले आयुष्य काढतात. या नागरिकांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि युवकांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पुढील पिढीला दिलेले शिक्षण व संस्कृतीचा वारसा, उत्तम जीवनमूल्यांची शिकवण यासाठी प्रत्येकाने त्यांचे सदैव ऋणी राहावे आणि त्यांच्याप्रति सौजन्य बाळगावे. अशा प्रकारची जाणीव मोठय़ा प्रमाणात रुजवावी, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.
* ‘कर्तव्य’ या उपक्रमाचे व्यवस्थापन कसे केले जाते?
कर्तव्य उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९० ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून या हेल्पलाइनवरील कॉल हाताळण्यासाठी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना हेल्पलाइनवर कॉल आला तर त्यांच्याशी कशा प्रकारे संभाषण करावे तसेच त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल कशी घ्यावी, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. एका खासगी संस्थेमार्फत २० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले असून हे कर्मचारीच २४ तास हेल्पलाइनचे कामकाज पाहणार आहेत.