सोमवारी (६ फेब्रुवारी) मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी (७ फेब्रुवारी) पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी ठाण्यातील पत्रकार आक्रमक झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आज ठाण्यात पत्रकारांनी निदर्शने केली.
हेही वाचा – “रोहित पवार पोरकट, त्यांची…”; सोलापूर लोकसभेच्या जागेवरून केलेल्या विधानानंतर प्रणिती शिंदेंची आगपाखड
यासंदर्भात बोलताना ठाणे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पितळे संताप व्यक्त केला. “राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे. हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली. तो कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या घटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा – “लवकरच काँग्रेसचे १५ आमदार फुटणार”; बच्चू कडूंच्या विधानावर पटोलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “काही हौशे-नवशे…”
राज्यातील पत्रकारांचा विविध पद्धतीने आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत, तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.