– संदीप आचार्य, लोकसत्ता

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील वाढत्या मृत्यूंची दखल घेऊन रुग्णालयातील आरोग्य सुधारणेसाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय हे येत्या दोन महिन्यांत कोलशेत येथील लोढा संकुलात स्थलांतरित करण्यात येणार असून, त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेत अतिदक्षता विभागाच्या विस्तारासह काही महत्वाचे विभाग सुरु करण्यात येणार आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

जानेवारी ते जुलै या सात महिन्यात या रुग्णालयात एकूण १०६१ रुग्णांचे मृत्यू झाले असून दर हजार रुग्णांमागे सरासरी ५१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या मृत्युंचे सखोल विश्लेषण करून आगामी काळात प्रभावी उपचार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्ण दगावल्यामुळे सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णालयात येऊन प्रशासनाला जाब विचारला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील या दुर्देवी घटनेमुळे शिंदे गटही हादरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन सर्वंकश चौकशीचे आदेश दिले. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच डॉक्टरांसह नऊ सदस्यांची समिती नियुक्त केली. या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावयाचा आहे. चौकशी समितीने गुरुवारी ठाणे पालिका मुख्यालयात चौकशी सुरु केली.

कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ जणांच्या मृत्यूचे पडसाद उमटू लागताच पालिकेतील अधिकारी व डॉक्टरांनी तसेच शिंदे समर्थकानी ठाणे जिल्हा रुग्णालय अन्यत्र हलविल्याची माहिती रुग्णांना नसल्याने कळवा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण आले व त्यातून मृत्यूंची संख्या वाढल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोग्य विभागानेही आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली व जिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचे काम सुरु असून त्याचे भूमिपुजन मुख्यमंत्री शिंदे यांनीच केले होते.

हेही वाचा : आजार निमोनियाचा आणि उपचार अर्धांगवायुचे कळवा रुग्णालयातील प्रकार; मनसेने उघडकीस आणला प्रकार

तसेच ठाणे मनोरुग्णालयानजिक ठाणे जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले. या रुग्णालयात रोज बाह्यरुग्ण विभागात किती रुग्ण येतात तसेच किती रुग्ण दाखल होतात, याची आकडेवारीच रुग्णालयाकडून देण्यात आली. ठाणे जिल्हा रुग्णालय अन्यत्र हलविण्याची माहिती रुग्णांना नव्हती असा दावा काही पालिका अधिकारी व कळवा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचा असेल तर मग कळवा रुग्णालयातील अतिरिक्त रुग्णांना ठाणे जिल्ह्यातील १९ धर्मादाय रुग्णालयांकडे का वर्ग केले नाहीत. यातील सात धर्मादाय रुग्णालये ही ठाण्यात असून कळवा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर व पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णांना तेथे का हलवले नाही, असा सवाल ठाण्यातील वैद्यकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.

जुलै २०२२ मध्ये बाह्यरुग्ण विभागात दोन लाख ३८ हजार ३८८ रुग्णांनी उपचार घेतले व त्यापैकी १६ हजार ९९६ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले होते. यंदा जुलै महिन्यात दोन लाख ८९ हजार ३४३ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले तर २१ हजार ६०६ रुग्ण दाखल होते. गेल्या वर्षी तीन हजार १३८ बालकांचा जन्म झाला तर यंदा ही संख्या तीन हजार १८८ होती. याचा अर्थ रुग्णालयावर फार मोठा रुग्णांचा ताण नव्हता, असे येथील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र मृत्यूची संख्या गेल्या वर्षीपेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षी जुलैअखेरीस ७३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद असून यंदा जुलैअखेरीस १०६१ मृत्यूंची नोंद आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यात कळवा रुग्णालयात १०६१ रुग्णांचे मृत्यू झाले. यात जानेवारी महिन्यात १७० जणांचे मृत्यू झाले तर फेब्रुवारीमध्ये १३४, मार्चमध्ये १३३, एप्रिलमध्ये १४७, मे महिन्यात १५४, जूनमध्ये १३४ आणि जुलै महिन्यात १८९ मृत्यूंची नोंद आहे. दर हजार रुग्णांमध्ये सरासरी ५१ मृत्यू हे प्रमाण असून एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या मृत्यूंच्या विश्लेषणाची नितांत गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कळवा रुग्णालयातील त्रुटी व भोंगळ कारभाराच्या अनेक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. यात गेल्या अनेक वर्षात रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्णवेळ अधिष्ठाता मिळालेला नाही वा मिळाला तर ते टिकत नाहीत. आतापर्यंत केवळ चार पूर्णवेळ अधिष्ठाता मिळाले. मात्र ते फार काळ टिकू शकले नाहीत. आजही रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी हंगामी स्वरुपातील असून रुग्णालयाला एकीकडे वैद्यकीय नेतृत्व नाही तर दुसरीकडे प्रमुख वैद्यकीय सेवांचे खासगीकरण करण्यात आल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर, डायलिसीस सेंटर, सीटी स्कॅन व चाचणी केंद्र आदी खजगी संस्थांना देण्यात आले असून यावर अधिष्ठात्यांचे नियंत्रण किती हा एक प्रश्न असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे. येथील स्वच्छतेसह काही खाजगी सेवांना असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे रुग्णालयातील स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. आयुक्त बांगर यांनी ही बाब लक्षात घेऊन स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या संस्थेला साडेपाच कोटी रुपयांचा दंड लावला आहे. कळवा रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता तसेच वरिष्ठ व कनिष्ट निवासी डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ८४० पदे असून यापैकी २४० पदे रिक्त आहेत.

हेही वाचा : ठाणे: रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात बदल; कार्यालयीन अधीक्षक आणि लिपीकांची नेमणूक

या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना विचारले असता, कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

“निवासी डॉक्टरांची सुसज्ज इमारत, रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात तसेच आवश्यक भरती प्रक्रिया सुरु आहे. कळवा रुग्णालयात अधिक जागा उपलब्ध करून तेथे काही विभाग सुसज्ज करण्याची योजना आहे. त्यासाठी ‘राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय’ कोलशेत येथील पालिकेला मिळलेल्या लोढा संकुलातील सुविधा भूखंडावरील १२ मजली इमारतीत आगामी दोन महिन्यात हलविण्यात येणार आहे,” असं आयुक्त बांगर यांनी सांगितले.

“यापुढे कळवा रुग्णालयातील कोणतीही बाब बाह्य यंत्रणेमार्फत केली जाणार नाही तर महापालिका स्वत:चीच रुग्णव्यवस्था उभी करेल. वैद्यकीय महाविद्यालय कोलशेत येथील लोढा संकुलाच्या जागेत गेल्यानंतर रुग्णालयात पुरेशी जागा उपलब्ध होईल. या जागेत अतिदक्षता विभाग, जनरल सर्जरी विभाग, स्त्रीरोग विभाग, लहान मुलांचा विभाग तसेच ट्रॉमा केअर विभाग सुरु करण्यात येणार आहे. रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या योग्य उपस्थितीसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवस्थेबरोबर प्रशासकीय यंत्रणा बळकट केली जाईल,” असे आयुक्त बांगर यांनी म्हटलं.

“चौकशी समितीच्या ज्या शिफारशी असतील त्याचीही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,” असेही आयुक्त म्हणाले.