नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलावरील एका मार्गिकेचे काम ऑगस्ट महिनाअखेर पुर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदाराला दिले होते. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी या पुलाचे काम अद्याप पुर्ण होऊ शकलेले नसून यामुळे यापुर्वी तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या कळवा पुलाच्या कामाची ऑगस्ट महिनाअखेरपर्यंतची मुदत हुकल्याचे चित्र आहे. यामुळे हा पुल अद्यापही वाहतूकीसाठी खुला होऊ शकलेला नसून यामुळे नागरिकांना अद्यापही कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्गिका रंगरंगोटी आणि कारागृहाकडील बाजूस पुलावर भिंती उभारणीची कामे सुरु असून हि कामे येत्या काही दिवसात पुर्ण होतील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे नवरात्रौत्सवाच्या काळात हा पुल वाहतुकीसाठी खुला होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपुर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विविध कारणाने पुलाचे काम रखडत असतानाच, करोना टाळेबंदीमुळे पूल उभारणीचे काम रखडले. त्यानंतर विविध कर वसुलीवर परिणाम झाल्याने पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. पुरेसा निधी नसल्यामुळे कळवा खाडी पुलाचे काम रखडण्याची भिती व्यक्त होत होती.

हेही वाचा : रिक्षा प्रवासी भाडे दरात चार रुपयांनी वाढ करा; ठाणे ऑटो रिक्षा मेन्स युनियनची राज्य शासनाकडे मागणी

परंतु पालिकेने टप्प्याटप्प्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून देत हे काम सुरुच ठेवले होते. जून २०२२ पर्यंत पुलाच्या कामाची मुदत संपली तरी त्याचे काम पुर्ण झालेले नाही. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांना एक पत्र देऊन हा पुल लवकर वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. तर, दुसरीकडे ठाणे महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी सुरु केली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या पूलाच्या कामाचा पाहाणी दौरा करत या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागासह ठेकेदाराला दिले होते. परंतु या मुदतीतही पुलाचे काम पुर्ण होऊ शकलेले नाही.

काय कामे शिल्लक

कळवा तिसरा खाडी पुलाचे बांधकाम एकूण २.४० किमी असणार आहे. १८१ कोटी १९ लाख रुपये खर्चून हा पूल तयार करण्यात येत आहेत. या खाडी पुलाची लांबी ३०० मीटरची आहे. या पुलावर क्रिक नाका आणि कोर्ट नाक्याहून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका उभारण्यात येत आहे. तसेच साकेतकडून येणाऱ्या वाहनांसाठी वर्तुळाकार मार्गिका उभारण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. पादचाऱ्यांकरिता स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्याचबरोबर विद्युतीकरण आणि सुशोभीकरण अशी कामे करण्यात येत आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत देवीचापाडा येथे गणपती विसर्जनासाठी खारफुटीची तोड; पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी

या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम पुर्ण झाले असले तरी त्याठिकाणी मार्गिका रंगरंगोटी अशी किरकोळ कामे सुरु आहेत. याशिवाय, कारागृहाच्या आतील बाजूचे चित्र दिसू नये म्हणून कारागृहाबाजुकडील पुलाजवळ भिंती उभारणीचे काम सुरु आहे. ही कामे पुर्ण होताच ही मार्गिका सुरु करण्यात येणार आहे. तर, उर्वरित मार्गिकांवरील पुलाच्या जोडणीची कामे अंतिम टप्प्यात असून या कामांबरोबरच इतर कामे पुर्ण करून या मार्गिका डिसेंबर अखेरपर्यंत खुली करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरु आहे.

या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम पुर्ण झाले असून याठिकाणी मार्गिका रंगरंगोटी अशी किरकोळ कामे सुरु आहेत. त्याचबरोबर कारागृहाच्या आतील बाजूचे चित्र दिसू नये म्हणून कारागृहाबाजुकडील पुलाजवळ भिंती उभारणीचे काम सुरु आहे. ही कामे लवकरच पुर्ण होतील आणि त्यानंतर ही मार्गिका सुरु करण्यात येईल. – संदीप माळवी ,अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane kalwa khadi bridge work deadline missed again open in navratra festival tmb 01
Show comments