ठाणे – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा स्तरावर एक दिवसीय सहलीसाठी नेण्यात येते. यंदा भिवंडीतील कालवार या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची भिवंडीत नुकतेच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडण्यात आला. या सहलीत काही विद्यार्थी जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत सहभागी झालेले पाहायला मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील हे पहिलेच मंदीर असावे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत अशा सर्वांसाठी हे मंदिर म्हणजे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे या मंदिराला भेट देण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच जिल्हा बाहेरुन अनेक मंडळी येत आहेत. नुकतेच भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात सहल नेण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला भेट देणारी कालवार जिल्हा परिषद ही पहिलीच शाळा आहे.

आजच्य़ा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे पराक्रम समजणे खूप गरजेचे आहे. या उद्देशाने कालवार जिल्हा परिषद शाळेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या सहलीच्या आयोजनासाठी शाळेला कालवार ग्रामपंचायत समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील एकूण २३० विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवरायांच्या मंदिराला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

अनेक विद्यार्थ्यांनी मावळा, जिजाऊ, येसूबाई आदींची वेशभूषा करून मंदिराला भेट दिली. मंदिरातील मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास समजावून सांगितला. त्यासह, मंदिराच्या स्थापत्यशास्त्रा विषयी माहिती देण्यात आली. तसेच या मंदिराच्या आवारात आगळ्यावेगळ्या वन भोजनाची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. छत्रपती शिवरायांच्या मंदिराला भेट देणारी कालवार ही पहिली शाळा ठरली आहे, अशी माहिती ‘शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांनी दिली.