ठाणे : उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी दिलेल्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईसाठी पाऊले उचलली आहेत. मात्र, रहिवाशांचा विरोध आणि पोलिस बंदोबस्त या कारणास्तव दिव्यातील ५४ तर, कल्याणमधील ६५ बेकायदा इमारतींवर प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात होऊ शकलेली नाही. असे असतानाच, प्रशासनाने आता बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली असून दिव्यात दोनजणांवर तर, टिटवाळ्यात ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी तसेच इतर शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. ठाणे आणि कल्याणमधील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून रहिवाशांना इमारतीमधील सदनिका रिकाम्या करण्याची नोटीस बजावण्यात येत आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी देताच, पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. यानंतर पालिकेचे पथक तिथे कारवाईसाठी गेले होते. परंतु नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेच्या पथकाला कारवाईविना माघारी फिरावे लागले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. कल्याणमधील ६५ बेकायदा इमारतींविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून कारवाईचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु रहिवाशांचा विरोध आणि पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात होऊ शकलेली नाही. एकीकडे बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईसाठी पालिकेने पाऊले उचलली असली तरी नागरिकांची फसवणुक करणारे भुमाफिया मात्र मोकाट फिरत असल्याची चर्चा रंगली होती. या मुद्दयावरून टिका होऊ लागताच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आता बेकायदा बांधकाम करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.

दिव्यात दोन गुन्हे दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ७६९ बेकायदा बांधकामे असून त्यापैकी ६६३ बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरीक्षकांनी बीट नोंदवहीत केल्याचे सांगत ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच दिले आहेत. तसेच या बांधकामांप्रकरणी त्यांनी सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली असून दिवा, मुंब्रा आणि कळवा या तीन प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता जमीन मालकासह बेकायदा इमारत उभारणाऱ्यांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. मोहन तुकाराम मढवी विरुद्ध ठाणे महापालिका या दाव्याच्या अनुषंगाने ११ जानेवारी रोजी पालिका प्रशासनाने दिव्यातील अनंत पार्कमधील १, २, ३ या इमारतींची पाहाणी केली. तसेच मालमत्ता विभागाकडे असलेल्या अहवालातील बांधकाम करारानुसार मेसर्स मंगला कंस्ट्रक्शन तर्फे ज्ञानेश्वर अनंत मुंडे यांनी अनंत पार्कमधील १, २, ३ या इमारतीचे तळ अधिक चार मजल्याचे बांधकाम विकासक म्हणून केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. पालिकेने इमारतीमधील सदनिकाधारक आणि गाळेधारकांना बांधकामासंबंधी महापालिकेच्या परवानगीबाबतची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, ते कागदपत्रे सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने १५ जानेवारी रोजी नोटीस बजावून ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेतली. त्यात बांधकामासंबंधीच्या परवानगीची कागदपत्रे सादर केलेली नसल्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिकेने जाहीर केले. याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे लिपीक संतोष लहाने यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलिसांनी जमीन मालक मोहन तुकाराम मढवी आणि मेसर्स मंगला कंस्ट्रक्शन तर्फे ज्ञानेश्वर अनंत मुंडे यांच्याविरोधात एमआरटीपी अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

टिटवाळ्यात पाच गुन्हे

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत टिटवाळा-मांडा परिसरात गेल्या काही वर्षात उभारण्यात आलेली ८०० हून अधिक बेकायदा बांधकामे मागील २५ दिवसात अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी भुईसपाट केली. आता बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या बांधकामधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली असून बुधवारी टिटवाळा पोलीस ठाण्यात पाच बेकायदा बांधकामधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. किताबुल्ला शेख, बैतुल्ला शेख, मुखलीस खालीक काबाडी, इफतीकार खालीक काबाडी, जुल्फकार खालीक काबाडी यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्रादेशक व नगररचना नियोजन आणि महापालिका अधिनयमाने हे गुन्हे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या आदेशावरून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, अधीक्षक शिरीष गर्गे यांनी दाखल केले.

Story img Loader