कल्याण – कल्याण पूर्व भागाला वीज पुरवठा करणाऱ्या पाल गाव हद्दीतील महावितरणच्या उपकेंद्रात अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची आहेत. या केंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील लोकधारा फिडरचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. लोकधारा फिडरवरून कोळसेवाडी परिसराला वीज पुरवठा होतो. त्यामुळे या विभागाचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी (ता.८) सकाळी १० ते संध्याकाळी पाच वेळेत बंद राहणार आहे, असे महावितरणच्या शिळफाटा विभाग साहाय्यक अभियंत्यांनी जाहीर केले आहे.
या कालावधीत कोळसेवाडी परिसराचा वीज पुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. पाल येथील २२० ईएचव्ही येथे देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या उपकेंद्रातून लोकधारा येथील फिडरला वीज पुरवठा केला जातो. तेथून हा वीज पुरवठा कोळसेवाडी विभागाला पुरवठा केला जातो. तापमानाचा पारा ३७ ते ४० अंश दरम्यान फिरत आहे. उन्हाच्या तलखीने नागरिक हैराण आहेत. अनेक नोकरदार अलीकडे घरातून कार्यालयीन काम करतात. त्यांची मंगळवारी हैराणी होणार आहे. अनेक रुग्णालयांचा कारभार वीज पुरवठ्यावर अवलंबून असतो. वीज पुरवठा नसेल तर शस्त्रक्रिया, आवश्यक वैद्यकीय उपचार प्रक्रिया खोळंबून राहतात. त्यामुळे रुग्णालय चालकही वीज पुरवठा बंद राहणार असल्याने् अस्वस्थ आहेत.
कल्याण पूर्व कोळसेवाडी भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय वीजेवर अवलंबून आहे. पीठाच्या चक्क्या, पावसाळ्यापूर्वी तिखट मसाला तयार करून देणाऱ्या तिखट कुट्टी मशीन या विजेवर चालतात. अलीकडे सर्वाधिक गर्दी तिखट मसाला कुटून देणाऱ्या कुट्टी मशीन चालकाच्या समोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. दुकानदार, उपहारगृह, हाॅटेल चालक, खासगी आस्थापना यांना वीज पुरवठा बंदचा फटका बसणार आहे. कोळसेवाडी भागात पालिका, खासगी शाळा आहेत. बहुतांशी शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. वीज पुरवठा बंद राहणार असल्याने वर्ग खोल्यांमधील पंखे बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घामाघुम होत उत्तरपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत.