ठाणे : उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबियांसह जिल्ह्यात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना आता शिमगोत्सवाचे वेध लागले आहेत. ठाणे परिवहन विभागातर्फे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ११ ते १३ मार्च या कालावधीत यंदा ८० ते ८५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील ७० टक्के गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून उर्वरित गाड्यांची आरक्षणाची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे. तर समूह आरक्षणाला ही प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे.
होळीसणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शिमगोत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियांसह गावी आवर्जून जातात. शिमगोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण, समूह आरक्षण, शहरातच एसटीची सुविधा उपलब्ध करून देणे यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याला प्रवाशांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मागील दोन वर्षात दिसून आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत यामुळे ज्येष्ठ वर्ग आणि महिला वर्ग गेल्या वर्षभराच्या कालावधीत एसटी प्रवासाकडे वळल्याचे एसटी विभागाची प्रवाशी आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. याच पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगोत्सवासाठी देखील अतिरिक्त बसगाड्यांची नियोजन करण्यात आले असून याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
होळीच्या आठ दिवस आधीपासूनच कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी केली जाते. यासाठी कोकणवासी मोठ्या संख्येने जातात. यंदा १३ मार्च रोजी होळी सण आहे. यासाठी ठाणे एसटी विभागातील आठ आगारांमध्ये सुमारे ८५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ११ मार्च ते १३ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत कोकणातील विविध तालुक्यांमध्ये या गाड्या धावणार आहेत. तर प्रवाशांची अधिक मागणी असल्यास अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागीय परिवहन अधिकारी धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
७० टक्के आरक्षण पूर्ण
कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे जिल्ह्यातील विविध आगारांमधून ७० टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे. तर प्रवाशांच्या मागणी नुसार गाडीचे समूह आरक्षण देखील केले जाते. यामध्ये समूह आरक्षण केलेल्या प्रवाशांच्या शहरात बस थेट जाऊन त्यांना तेथून त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवते. सद्दस्थितीत ठाणे एसटी विभागातून सुमारे १० गाड्यांचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे.