ठाणे : विधानसभा निवडणुकीत कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढणारे काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी रविवारी आपल्या समर्थकांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून हा ठाणे काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून मनोज शिंदे यांची ओळख होती. ते पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्षही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : डोंबिवली : पलावा येथील चायनिज ढाब्यात विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या चालकावर गुन्हा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकण पट्ट्यात काँग्रेस पक्षाला जागा देण्यात आलेल्या नसल्यामुळे मनोज शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघामधून बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपक्ष निवडणुक लढविली. या बंडखोरीमुळे मविआचे म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांचे मताधिक्य कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात मात्र मनोज शिंदे यांना केवळ १ हजार ६५३ इतकीच मते मिळाली. दरम्यान, मनोज शिंदे यांनी वाढदिवसानिमित्ताने रविवारी मनोजोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. आधीच ठाणे काँग्रेसची वाताहात झालेली असतानाच, त्यात मनोज शिंदे याचा पक्ष प्रवेश हा ठाणे काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane kopri pachpakhadi congress rebel candidate manoj shinde contested against cm eknath shinde joined eknath shinde s shivsena css