सदस्यत्व नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा महापालिकेचा निर्णय
ठाण्यातील तरणतलावांचे सदस्यत्व मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला ठाणेकरांचा संघर्ष कमी होण्याची चिन्हे आहेत. ठाणे आणि कळवा परिसरातील तीन तलावांचे सदस्यत्व मिळवण्याची प्रक्रिया यापुढे ऑनलाइन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शाळेच्या सुट्टय़ा लागल्यानंतर तरणतलावाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी मुले व पालकांना अक्षरश: पहाटेपासून रांगा लावाव्या लागतात. मात्र, आता ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने पालकांची रांगेतून सुटका होणार आहे.
बॅंक आणि पोस्ट कार्यालय, बिल भरण्याचे ठिकाणे, शाळांमधील प्रवेश यासाठी रांगा लावणे हे अनेकांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र, ठाणे शहरातील तरण तलावांमध्ये पोहोण्यासाठी प्रवेश मिळवण्याकरिताही रांगा लावाव्या लागत होत्या. त्यातही महापालिकेच्या तरणतलावांच्या ठिकाणी कमी शुल्क आकारण्यात येत असल्याने तेथे सदस्यत्वासाठी गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गडकरी रंगायतनच्या बाजूला महापालिकेच्या मालकीचा मारोतराव शिंदे तरणतलाव हा त्यापैकीच एक आहे. या ठिकाणी मर्यादित शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे हा तलाव नेहमीच जलतरणपटूंनी गजबजलेला असतो. त्यामुळे या तरणतलावाचे सदस्यत्व अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला असल्याची माहिती मारोतराव शिंदे तरणतलावाचे व्यवस्थापक चंद्रकांत शिंगळे यांनी लोकसत्ताला दिली.
सध्या शिंदे तरण तलाव येथे दोन हजाराहून अधिक सभासद आहेत. त्यापैकी दर महिन्या अखेर काही सभासद बाद होतात. बाद झालेल्या सभासदांच्या जागेवर नवीन सभासदांना प्रवेश दिला जातो. मात्र बाद होणाऱ्यांच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने सर्वाना प्रवेश देता येत नाही. त्यामुळे प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी या ठिकाणी रांगा लागत. ऑनलाइन प्रणालीमुळे अर्ज भरणे सोपे होणार असले तरी प्रवेश मिळण्याची शाश्वती देता येणार नाही. तसेच प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा वापर करावा का? यावर पालिका प्रशासन स्तरावर विचार सुरू असल्याची माहिती शिंगळे यांनी दिली.