ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडणार हे जवळपास स्पष्ट असले तरी याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार कोण असेल या‌विषयी मात्र संभ्रम अजूनही कायम आहे. नवी मुंबईतील एका शासकीय सोहळ्यानिमित्त गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि या भागातील भाजपचे नेते गणेश नाईक एकत्र आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि नाईकांमधील देहबोली कमालीची सकारात्मक होती असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. नाईकांचा सत्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या असे म्हणतात. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना या दोन नेत्यांमधील आदरभावने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर माजी खासदार राहिलेले नाईकांचे पुत्र संजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का अशी नवी चर्चाही यानिमीत्ताने सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांचे गणित लक्षात घेता यंदा भाजपने हा मतदारसंघ मिळावा यासाठी जोरदार आग्रह धरला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतो. शिवाय मुख्यमंत्री स्वत:ला ज्यांचे शिष्य म्हणवितात त्या शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी एकेकाळी भाजपच्या पदरातून ठाणे लोकसभा मतदारसंघ अक्षरश: खेचून आणला होता. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हेही वाचा – मुरबाडमधील कपील पाटील यांच्या बैठकीकडे किसन कथोरे समर्थकांची पाठ

महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच मिळेल याविषयी हळुहळू स्पष्टताही येऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात या पक्षाचा उमेदवार कोण असेल याविषयी तर्कवितर्कांना उत आला असताना अचानक माजी खासदार संजीव नाईक यांच्या नावाच्या चर्चेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाईक -शिंदे मनोमिलन टिकेल ?

नवी मुंबईच्या राजकारणावर गेली अनेक दशके गणेश नाईक यांचा एकहाती वरचष्मा राहिला आहे. नाईक म्हणतील तीच पूर्वदिशा असा या भागातील कारभार असायचा. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरुवातीला नगरविकास मंत्रीपद आणि आता थेट मुख्यमंत्रीपद आल्यामुळे नवी मुंबईतील कामांवरील सध्या ठाण्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. यामुळे नाईकांची नाराजी वेळोवेळी व्यक्त झाली आहे. नवी मुंबई महापालिकेतील नियुक्त्याही ठाण्याहून ठरविल्या जात आहेत. त्यामुळे अनेक वर्ष नाईक निष्ठ असलेल्या अनेक अधिकाऱ्यांची सध्या अडचण झाल्याचे पहायला मिळत आहे. या घडामोडींमुळे नाराज असलेल्या नाईकांनी मध्यंतरी ‘नवी मुंबईचे कारभारी ठरविणारे तुम्ही कोण?’ अशा शब्दात थेट मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागालाच आवाज दिला होता. यानंतर या दोन नेत्यांमधील विसंवादाची चर्चाही सातत्याने रंगली होती. गेल्या आठवड्यात मात्र एका कार्यक्रमात उपस्थितांना नेमके उलट चित्र दिसले.

हेही वाचा – जादा परताव्याच्या आमिषाने गुतंवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक, सॅमसन युनिट्रेड कंपनीचा संचालक अटकेत

वर्षावर नाईकांचे आदरातिथ्य

नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या वेगवेगळ्या विकासकामांच्या भूमीपूजनाचा एक सोहळा गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी स्थानिक आमदार म्हणून गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतानंतर त्यांच्याच सुचनेवरुन महापालिका प्रशासनाने गणेश नाईकांचे केलेले विशेष स्वागत अनेकांसाठी लक्षवेधी ठरले. त्यानंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी नाईकांचा उल्लेख अनेकवेळा ‘दादा’ असा केला. आजवरच्या आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी या शब्दाचा उल्लेख टाळल्याचे पहायला मिळाले होते हे विशेष.

लोकसभेसाठी मनोमिलन ?

ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेच्या पदरात पडणार असल्याने नवी मुंबईतून नाईक समर्थकांचे पुरेपूर पाठबळ मिळणे मुख्यमंत्र्यांसाठीही आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ही निवडणूक होणार असल्याने भाजप नेते म्हणून नाईकांना महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात झोकून देऊन काम करावेच लागणार असले तरी त्यांचे समर्थक मात्र नेमकी कोणती भूमीका घेतात हेही पहाण्यासारखे ठरेल. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर संजीव नाईक यांनी निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली असून यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

नवी मुंबईत नाईक आणि मुख्यमंत्री समर्थकांमध्ये विस्तवही जात नाही. असा काही प्रयोग झालाच तर आम्ही वेगळा मार्ग पत्करू असा इशाराच मुख्यमंत्री समर्थक खासगीत बोलताना देऊ लागले आहेत. ठाण्यातील शिवसेनेत असा काही प्रयोग होईल ही शक्यता अगदीच कमी असल्याची चर्चा असली तरी याविषयीचा संभ्रम मात्र कायम आहे. नाईक कुटुंबियांनी अथवा संजीव नाईक यांनी यासंबंधी जाहीर भाष्य अद्याप केलेले नाही. शिवसेनेतील नेतेही याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नसले तरी मुख्यमंत्री असा काही प्रयोग नक्कीच करणार नाहीत अशी प्रतिक्रिया पक्षाच्या ठाण्यातील एका नेत्याने दिली. आमच्या पक्षाकडे उमेदवार नाही असा संदेश यामुळे जाईल आणि त्यामुळे हे होणे नाही असा हा नेता म्हणाला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane lok sabha constituency eknath shinde respect between cm and ganesh naik will sanjeev naik enter the election fray ssb