ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने मतदार संघात प्रचार यात्रा काढली असून त्यापाठोपाठ आता महायुतीनेही पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावत ६ विधानसभा क्षेत्रातील विविध मित्र पक्षांच्या १५० प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समन्वयक चमू तयार केला आहे. या समन्वयकामार्फत प्रचाराच्या नियोजनाची रणनिती आखली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज नुकतेच दाखल केले. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसली असून युती आणि आघाडीकडून उमेदवारांच्या विजयासाठी प्रचाराची रणनिती ठरविण्यास सुरूवात केली आहे. या रणनितीचा एक भाग म्हणून उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून शनिवारी प्रचार यात्रा काढली. तर, नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली. त्यापाठोपाठ शनिवारी दुपारी ठाण्यातील भाजपच्या मुख्यालयात महायुतीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. यामध्ये ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा भाईंदर, ऐरोली, बेलापूर या ६ विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे प्रमुख १५० पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांचा समन्वयक चमूमध्ये समावेश करण्यात आला असून ते प्रचाराची दिशा, जाहीर सभा, प्रचार साहित्य यांचे नियोजन करणार आहे. नरेश म्हस्के यांनीही बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघावर ठाकरे गटाने केले लक्ष केंद्रीत, राजन विचारेंच्या प्रचार यात्रेची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपखाडीतून

या समन्वयकांचा व्हाट्सॲप समुह तयार करण्यात आला असून मतदानापर्यंत समन्वयकांनी सुट्टी घेऊ नये, सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करावा, दुपारी १ ते ४ मान्यवरांच्या बैठका घ्याव्या, बूथ स्तरावर आणि मतदार यादीवर काम करा, अशा सुचना महायुतीच्या नेत्यांनी समन्वयकांना बैठकीत दिल्या.

हेही वाचा…कल्याण लोकसभा क्षेत्रात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रेंचा शिंदेच्या सेनेत प्रवेश

ठाणे लोकसभा मतदार संघासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये भाजपाचे ओवळा माजिवडा मंडळ अध्यक्ष ॲड हेमंत म्हात्रे यांचा समावेश होता. या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचे काम पक्षाच्या नेत्यांकडून सुरू असतानाच, शनिवारी भाजपाच्या वर्तकनगर येथील मुख्यालयात प्रमुख पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांची बैठक पार पडली. या बैठकीत ॲड. म्हात्रे यांच्यासह नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढून नाराजी दूर करण्यात आली. दरम्यान, काही गैरसमज होते, ते आता दूर झाले असून म्हस्के यांच्या विजयासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया म्हात्रे यांनी बैठकीनंतर दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane lok sabha election mahayuti mobilize campaign teams for candidate support psg
Show comments