ठाणे शहरात फेरीवाल्यांचे वाढत असलेले प्रस्थ, त्यांच्या अतिक्रमणांमुळे गिळंकृत झालेले रस्ते आणि फेरीवाल्यांना मिळणारे राजकीय अभय या मुद्दय़ांवरून कायम टीकेचे धनी बनलेल्या ठाणे महापालिकेने अखेर फेरीवाला मुक्तीसाठी मोहीम हाती घेतली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांतील मुख्य आणि वर्दळीचे रस्ते ‘नो हॉकर्स झोन’ जाहीर करून तेथील फेरीवाल्यांना हटवण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार आहेच; पण पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे सुकर होणार आहे.
ठाण्यातील बहुतांश महत्त्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमणे करून रस्ते तसेच पदपथ अडवले आहेत. या फेरीवाल्यांना स्थानिक राजकीय नेत्यांकडून संरक्षण मिळत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नाही. तर दुसरीकडे, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे नाटक करणारे महापालिका प्रशासन त्यांच्याकडून ताबा पावतीच्या रूपात पैसेही गोळा करते. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेवर सातत्याने टीका होते. यामुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाचे डोळे उघडले असून फेरीवाला मुक्त परिसरासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे ठरवण्यात आले आहे. या योजनेंतर्गत शहरातील मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणाहून फेरीवाल्यांना हटवण्यात येणार आहे. अशा रस्त्यांची माहिती गोळा करणे सुरू असून त्यानंतर कारवाई सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

वर्दळीचे परिसर
ठाणे स्थानक, गोखले रोड, हरीनिवास, राम मारुती रोड, कोपरी, वर्तकनगर, शिवाईनगर, नितीन कंपनी, तीन हात नाका, कॅडबरी, खोपट, गोकुळनगर, महापालिका मुख्यालय, वसंत विहार, मानपाडा, कापूरबावडी.