ठाणे : ढोकाळी येथील मंदिरात नंदीबाबा मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्ताने कापूरबावडी, ढोकाळी, कोलशेत, मनोरमानगर, मानपाडा भागातील हजारो नागरिक दर्शनासाठी मंदिरात येत असतात. तसेच परिसरात जत्रेचे देखील आयोजन केले जाते. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते १० या वेळेत हे वाहतुक बदल असतील. वाहतुक बदलामुळे पर्यायी मार्गांवर भार येऊन कोंडीची शक्यता आहे.
ढोकाळी नाका परिसरात नंदीबाबा मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते. तसेच परिसरात चार दिवस जत्रा देखील भरते. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसानी येथील मार्गावर वाहतुक बदल लागू केले आहेत. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरून नळपाडा मार्गे कोलशेतच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना नळपाडा सिग्नल येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी मार्गे सरळ, मानपाडा पूलाखालून वळण घेऊन आर माॅल मार्गे इच्छितस्थळी जातील.
मानपाडा-माजिवडा प्रभाग समिती येथून हायलँड रोड मार्गे कोलशेत, ढोकाळीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रभाग समितीजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने आर माॅल किंवा बाळकुम नाका, दोस्ती वेस्ट काँटी मार्गे वाहतुक करतील. कोलशेत येथून नंदीबाबा मंदिर मार्गे किंवा प्रभाग समिती मार्गे कापूरबावडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना ढोकाळी सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मनोरमानगर किंवा लोढा अमारा, ब्रम्हांड मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत लागू असतील.