प्रजासत्ताक दिनाची सुट्टी त्याला लागून आलेले शनिवार आणि रविवार ठाण्यातील मॉलना मालामाल करून गेले. मॉल व्यवस्थापकांनी खरेदीवर दिलेल्या अमाप सवलतींमुळे व्यवसाय दुपटीने वाढल्याचे सांगण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासोबत मनोरंजन आणि खरेदीचा आनंद घेणाऱ्यांमुळे आठवडय़ाच्या शेवटी ग्राहकसंख्येने ३५ ते ४० टक्क्यांचा आकडा गाठला. या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कपडे आणि महागडय़ा वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाल्याची माहिती मॉल व्यवस्थापकांनी दिली.
ठाण्यातील कोरम मॉलमध्ये आठवडय़ाच्या शेवटी सरासरी ७० ते ८० हजार ग्राहक खरेदीसाठी येतात. या तीन दिवसांच्या सुटीला सुमारे आठ लाख ग्राहकांनी मॉलला भेट दिली, अशी माहिती व्यवस्थापकांनी दिली. सगळ्याच ब्रॅण्डेड दुकानांनी खरेदीसाठी ऑफर्स आणि सेलची रेलचेल केली होती. या आठवडय़ामध्ये प्रामुख्याने इलेक्टॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडल्या. यावेळी मॉलमध्ये भेट देणाऱ्या ग्राहकांना मोफत पाìकग सुविधा देण्यात आली होती. शिवाय कोरम मॉलच्या वतीने भारतातील विविध नृत्यकलांचा आविष्कार एकाच ठिकाणी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यावेळी ‘मितवा’ या मराठी चित्रपटातील अभिनेते स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मॉलला भेट देऊन त्यांच्या आगामी ‘मितवा’ चित्रपटाची माहिती उपस्थित ग्राहकांना दिली, अशी माहिती कोरमचे महाव्यवस्थापक देवा ज्योतुला यांनी दिली.
फॅशनला पसंती
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्येही सुमारे ३५ टक्क्यांनी वाढ झाली होती. दैनंदिन फॅशनविषयक खरेदीकडे ग्राहकांची मोठी ओढ होती. डोंबिवलीत राहणाऱ्या विक्रांत शिंदे यांना मॉलच्या वतीने स्पर्धेचे भाग्यवान विजेता होण्याचा मान मिळाला. त्यांनी चारचाकी कार जिंकल्याची माहिती विवियाना मॉल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.