एकाच कुटुंबातील १४ जणांच्या हत्येने ठाणे हादरले
घरी खास ‘दावत’ आयोजित केली आहे.. सर्वानी आवर्जून उपस्थित राहायचे, हा प्रेमळ आग्रह.. भावाच्या आग्रहाखातर मुला-मुलींसह बहिणी जमलेल्या.. ‘दावत’ असल्याने घरात आई-वडील, पत्नी, मुलेही आनंदात.. ‘दावत’ आटोपताच निजानीज होते.. आणि मध्यरात्री अचानक सर्वावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला होतो.. आई-वडील, बहिणी, पत्नी, पोटच्या मुली, भाचे-भाची सर्वाचीच हत्या होते.. घरात रक्ताचे पाट वाहतात.. हे हत्याकांड करणारा स्वतही आत्महत्या करून इहलोकीची यात्रा संपवतो.. जिवाचा अक्षरश थरकाप उडवणारी ही घटना घडली येथील कासारवडवलीत.
एकाच कुटुंबातील १४ जणांच्या हत्येच्या वृत्तानेच ठाणेकरांचा रविवार उजाडला. कासारवडली गावात राहात असलेल्या वरेकर कुटुंबात शनिवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले. हत्याकांड करणारा हसनैन वरेकर (३५) हा घरातला कर्ताधर्ता मुलगा. घरात आई-वडील, पत्नी, दोन मुली (त्यातील एक अवघ्या तीन महिन्यांची), एक अविवाहित बहीण असा परिवार. हसनैनने शनिवारी घरी ‘दावत’ आयोजित केली. त्यासाठी माहेरी प्रसूतीसाठी गेलेली पत्नी जबीन (२८) हिला तो तान्ह्य़ा मुलीसह घरी घेऊन आला. तीनही विवाहित बहिणींनाही मुलाबाळांसह खास आग्रह करून हसनैनने घरी बोलावून घेतले. भिवंडीत राहणाऱ्या सुबिया हिला तर तिच्या पाच महिन्यांच्या मुलीसह तो मोटारसायकलवरून घेऊन आला. शनिवारी रात्री ठरल्याप्रमाणे वरेकर कुटुंबियांचा ‘दावत’चा कार्यक्रम आनंदात पार पडला. सर्वजण दुमजली घरामध्ये झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हसनैनने आई-वडिलांसह पत्नी, दोन मुली, चार बहिणी आणि त्यांची मुले अशा एकूण १५ जणांच्या गळ्यावर तीक्ष्ण सुरीने वार केले. त्यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुबिया मात्र या हल्ल्यात जखमी झाली.
हसनैनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुबियाने त्याला प्रतिकार करत स्वतला एका खोलीत कोंडून घेतले. सर्व नातेवाइकांची अतिशय थंड डोक्याने हत्या केल्यानंतर हसनैनने घरामध्येच नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, घरात कोंडून घेतलेल्या बहिणीने जखमी अवस्थेत शेजाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन घराची ग्रील तोडली आणि तिला घराबाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला, मात्र त्यामध्येही हत्याकांडाचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा