हसनैनच्या हल्ल्यानंतर स्वत:ला कोंडून घेतले; मदतीसाठी आक्रोश
थंड डोक्याने सर्वावर वार करत सुटलेल्या हसनैनने बहीण सुबियावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघांत झटापट झाली. मात्र, सुबियाने स्वत:ला घरातील एका छोटय़ा खोलीत कोंडून घेतल्याने ती या हत्याकांडातून बचावली. भावाच्या कृत्यामुळे भेदरलेल्या सुबियाने मदतीसाठी आक्रोश सुरू केला; परंतु मध्यरात्र असल्याने शेजारीही गाढ झोपेत होते. अखेरीस सुबियाचा आक्रोश शेजारील शाहिस्ता वरेकर यांच्या कानावर गेला. त्यांनी तातडीने मुलगा अल्तमश याला उठवून शेजारी काय गडबड आहे, हे पाहण्यास सांगितले. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
एका खासगी बँकेत अल्तमश वरेकर (२२) हा सेल्समन म्हणून काम करतो. शनिवारी रात्री तो घरामध्ये झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास शेजारच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई शाहिस्ता यांना जाग आली. त्यानंतर त्यांनी अल्तमशला उठविले आणि ते दोघे घराबाहेर आले. त्या वेळी जखमी अवस्थेत सुबिया घराच्या खिडकीतून मदत मागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अल्तमश याने तात्काळ तिच्या मदतीसाठी धावपळ सुरू केली. अल्तमशने केलेल्या धावपळीमुळे सुबियाला तात्काळ मदत मिळून तिचे प्राण वाचले.
कासारवडवली गावातील एका मशिदीजवळच वरेकरांचे दुमजली घर आहे. तिथे हसनैन आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली व एक अविवाहित बहीण यांच्यासह राहायचा. नवी मुंबईतील एका कंपनीत हसनैन लेखा परीक्षणासंदर्भातील काम करायचा. त्याला महिना ६० हजार रुपये वेतन होते. वडील अन्वर वरेकर एका रसायन कंपनीतून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते जमिनीच्या व्यवहारांत दलाली करायचे. तसेच कासारवडवलीतील आनंदनगर भागातील परदेशीबाबा दग्र्याचे ते विश्वस्तही होते. हसनैनला तीन विवाहित बहिणी होत्या. हसनैन याच्या बहिणी शबिना खान व मारिया फक्की या दोघी कोपरखैरणे परिसरात राहायच्या तर सुबिया भिवंडीतील महापोली गावात राहते. या सर्वाना तो अधूनमधून घरी बोलवायचा.

* या घटनेतून बचावलेली सुबिया हीच एकमेव साक्षीदार आहे. रुग्णालयात दाखल असलेली सुबिया या घटनेमुळे हादरून गेली आहे. तिच्याकडून घटनेची जुजबी माहिती मिळाली आहे. मात्र, हत्याकांडामागील कारण अद्याप अस्पष्टच असल्याचे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.
* हसनैनचा मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आला असून तो न्यायवैद्यक विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.
* त्याच्या कामाच्या ठिकाणी एक पथक पाठविण्यात आले असून तेथेही काही धागेदोरे हाती लागतात का, याचा तपास करण्यात येत आहे.
* त्याचप्रमाणे १ जुलै २०१२ रोजी भोंदूबाबाचे औषध प्राशन केल्यामुळे हसनैनचे आई-वडील आणि बहिणीला जुलाब व उलटय़ांचा त्रास झाला होता. त्या वेळी त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
* या रुग्णालयातून त्या वेळचे रेकॉर्ड मिळालेले आहेत. मात्र, या घटनेप्रकरणी त्या वेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता, असे डुंबरे यांनी सांगितले. वारेकर कुटुंबीयांनी शनिवारी रात्री तंदुरी आणि सरबत प्राशन केले होते.
* त्या अन्नासह मृतांचे रक्त, व्हिसेरा आदींचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तसेच हत्याकांडामागचे कारण शोधण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू असल्याचे डुंबरे म्हणाले.

हसनैनचा स्वभाव साधा व शांत होता. त्याचे कुणाशीही वैर नव्हते. त्यामुळे त्याने हे असे का केले, हे कळायला मार्ग नाही.
– रिझवान वरेकर, हसनैनचे काका

हत्याकांडामागचे कारण शोधण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू आहे. असे असले तरी, शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक विभागाच्या अहवालानंतरच हत्याकांडामागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
– आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त

Untitled-2

Story img Loader