हसनैनच्या हल्ल्यानंतर स्वत:ला कोंडून घेतले; मदतीसाठी आक्रोश
थंड डोक्याने सर्वावर वार करत सुटलेल्या हसनैनने बहीण सुबियावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघांत झटापट झाली. मात्र, सुबियाने स्वत:ला घरातील एका छोटय़ा खोलीत कोंडून घेतल्याने ती या हत्याकांडातून बचावली. भावाच्या कृत्यामुळे भेदरलेल्या सुबियाने मदतीसाठी आक्रोश सुरू केला; परंतु मध्यरात्र असल्याने शेजारीही गाढ झोपेत होते. अखेरीस सुबियाचा आक्रोश शेजारील शाहिस्ता वरेकर यांच्या कानावर गेला. त्यांनी तातडीने मुलगा अल्तमश याला उठवून शेजारी काय गडबड आहे, हे पाहण्यास सांगितले. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
एका खासगी बँकेत अल्तमश वरेकर (२२) हा सेल्समन म्हणून काम करतो. शनिवारी रात्री तो घरामध्ये झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास शेजारच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई शाहिस्ता यांना जाग आली. त्यानंतर त्यांनी अल्तमशला उठविले आणि ते दोघे घराबाहेर आले. त्या वेळी जखमी अवस्थेत सुबिया घराच्या खिडकीतून मदत मागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अल्तमश याने तात्काळ तिच्या मदतीसाठी धावपळ सुरू केली. अल्तमशने केलेल्या धावपळीमुळे सुबियाला तात्काळ मदत मिळून तिचे प्राण वाचले.
कासारवडवली गावातील एका मशिदीजवळच वरेकरांचे दुमजली घर आहे. तिथे हसनैन आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली व एक अविवाहित बहीण यांच्यासह राहायचा. नवी मुंबईतील एका कंपनीत हसनैन लेखा परीक्षणासंदर्भातील काम करायचा. त्याला महिना ६० हजार रुपये वेतन होते. वडील अन्वर वरेकर एका रसायन कंपनीतून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते जमिनीच्या व्यवहारांत दलाली करायचे. तसेच कासारवडवलीतील आनंदनगर भागातील परदेशीबाबा दग्र्याचे ते विश्वस्तही होते. हसनैनला तीन विवाहित बहिणी होत्या. हसनैन याच्या बहिणी शबिना खान व मारिया फक्की या दोघी कोपरखैरणे परिसरात राहायच्या तर सुबिया भिवंडीतील महापोली गावात राहते. या सर्वाना तो अधूनमधून घरी बोलवायचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा