ठाणे : कळवा येथील मनिषा नगर भागात दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला यांची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर दिलीप यांचाही अचानक मृत्यू झाला. दिलीप यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप साळवी हे कळव्यातील माजी नगरसेवक गणेश साळवी यांचे भाऊ आहेत. मनिषानगर येथील कुंभारआळी परिसरातील यशवंत निवासमध्ये दिलीप साळवी हे त्यांची पत्नी प्रमिला, मुलगा आणि आईसोबत वास्तव्य करत होते.
हेही वाचा : इन्स्टाग्रामवरील चर्चेचा जाब विचारल्याने डोंबिवलीत पत्नीची आत्महत्या
दिलीप आणि प्रमिला यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. दिलीप यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दिलीप यांनी त्यांच्या बंदूकीने प्रमिला यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी प्रमिला यांच्या चेहऱ्यावर लागली. यात प्रमिला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिलीप यांचाही अचानक मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.