कल्याण : येथील योगीधाम अजमेरा हाईट्स संकुलातील एका कुटुंबाने धूप अगरबत्ती लावली आणि त्या धुराचा त्रास होतो या कारणामुळे शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला यांच्या इशाऱ्यावरून त्यांच्या दहा समर्थकांनी मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा मराठी एकीकरण समितीने तीव्र शब्दात निषेध केला. या मारहाण प्रकरणी शुक्ला यांच्यासह दोषींंवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली.

‘मराठी माणसे घाणेरडी असतात. ती मटणमांस खातात. आपणास मराठीचे काही सांगू नका. ५६ मराठी माणसे माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन करीन तर तुमचे मराठीपण जाईल. थोडा वेळ थांब तुला बघून घेतो,’ अशी धमकी शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी तक्रारदार धीरज देशमुख यांना दिली होती. हे प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच शुक्ला यांनी आपल्या आठ ते दहा समर्थकांना रात्रीच बोलावून देशमुख कुटुंबियांसह लता कळवीकट्टे या मराठी कुटुंबियांना मारहाण केली होती. देशमुख यांच्या भावावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले.

हेही वाचा…कल्याणमधील शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला यांचे खासगी वाहन जप्त

लोखंडी शस्त्राचा वापर करून हत्येचा प्रयत्न, घरातील महिलेचा विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, जमाव गोळा करणे, मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरून भाषिक व प्रांतिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शुक्ला यांनी केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने ठाणे पोलीस आयुक्त, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांकडे केली.

मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांंनी कल्याणमध्ये येऊन योगीधाम अजमेरा संकुलात येऊन धीरज देशमुख, लता कळवीकट्टे कुटुंबियांची भेट घेतली. हल्ल्यातील जखमी अभिजित देशमुख यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना मराठी एकीकरण समिती आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा…फळबाजारात फडकतोय डाळींबाचा “भगवा”, आवक घटल्याने डाळींबाची चढ्या दराने विक्री

नागरिकांचे समाधान

मराठी माणसांवर गंंभीर प्रसंग येताच मराठी एकीकरण समितीने घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांनी समाज माध्यमांतून समाधान व्यक्त केले आहे. मराठी एकीकरण समिती ही मराठी माणसाचे संरक्षक कवच आहे. मराठीच्या हक्कासाठी वेळ असल्यास तो मराठी एकीकरण समितीला द्या. निस्वार्थी भावनाने आणि जातीपातीचे बंधने तोडून मराठी माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्याला मराठी नागरिकांनी एकजुटीने पाठिंबा दिला पाहिजे, अशी अनेक प्रकारची मते मराठी भाषक नागरिकांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहेत.

Story img Loader