ठाणे शहरातील वाचन चळवळ सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा १२२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. नववर्षांत ग्रंथालयाच्या इमारतीत अंतर्गत बदल करण्यात येणार आहेत. या बदलांमुळे हे ग्रंथालय आता अत्याधुनिक ग्रंथदालनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अत्याधुनिक सभागृह, प्रशस्त अभ्यासिका, वातानुकूलित ई-ग्रंथ दालन आणि दुर्मीळ पुस्तकांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्याच्या दृष्टीने काम सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय यंदा ग्रंथालयाच्या अंतर्गत व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून या माध्यमातून ग्रंथालय अधिक वाचकाभिमुख होऊ शकणार आहे.
– ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाने २००८-०९ मध्ये नव्या इमारतीमध्ये ग्रंथालयीन कामकाजाला नव्याने सुरुवात केली. तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था, पहिल्या मजल्यावर पुस्तके देवघेव विभाग, मुक्तद्वार वाचन विभाग, महिला व बाल ज्येष्ठ नागरिकांसाठी विभाग करण्यात आले होते. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील भाग व्यावसायिक संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आले असून पाचव्या मजल्यावर सभागृह कार्यक्रमांसाठी वापरण्यात येत होते. संस्थेचे सर्व कार्यक्रम पाचव्या मजल्यावरील सभागृहामध्ये होत होते. या रचनेमध्ये येत असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन संस्थेने पुन्हा अंतर्गत पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचव्या मजल्यावरील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पोहचणे ज्येष्ठ सदस्यांना कठीण जात होते. एकमेव उद्वाहकामध्ये मोठी गर्दी होत असे शिवाय अनेक वेळा तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्यास सदस्यांना पाच मजले चढून जाणे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे पाचव्या मजल्यावरचे सभागृह पहिल्या मजल्यावर आणण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर तयार करण्यात येणारे सभागृह छोटेखानी नाटय़गृहाप्रमाणेच असेल शिवाय त्यामध्ये दृकश्राव्य सादरीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावरील पुस्तक देवघेव विभाग आणि मुक्तद्वार वाचन विभाग दुसऱ्या मजल्यावर हलवण्यात येणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर असणारी अभ्यासिका पाचव्या मजल्यावर हलवण्यात येणार आहे.
– ग्रंथसंग्रहालयाच्या कपाटांची व्यवस्था बदलण्यात येणार असून कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पुस्तके अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मांडण्यात येणार आहे. त्यामुळे जागेचा पुरेपूर वापर होण्यास मदत होणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये बदललेल्या स्वरूपात ग्रंथालय वाचकांच्या भेटीस येऊ शकणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह विद्याधर ठाणेकर यांनी दिली.
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात प्रशस्त अभ्यासिका, ई-ग्रंथालय
ठाणे शहरातील वाचन चळवळ सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा १२२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
आणखी वाचा
First published on: 02-06-2015 at 12:09 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane marathi granth sangrahalaya