ठाणे – मराठी नववर्षानिमित्ताने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षानुवर्षे रुजली आहे. गुढी सजवण्यासाठी लागणारा वेळ आणि कसरत हे अनेकांसाठी आव्हान ठरते. त्यामुळे शहरातील बाजारात तयार गुढी तसेच विविध कापडांपासून तयार केलेले वस्त्र विक्रीसाठी दाखल झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.
गुढी पाडव्यानिमित्त ठाणे शहरातील बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. काही नागरिकांना गुढी उभारणीसाठी वेळ मिळत नाही. तर काहींना पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी शहरातील बाजारात गुढीसाठी कापडापासून तयार केलेले तयार वस्त्र उपलब्ध झालेले आहेत. यामध्ये खण, शाही मस्तानी, नऊवारी, पैठणी अशा विविध रंगातील आकर्षक तयार वस्त्र आहेत. या वस्त्रांच्या किंमती १५० ते ५०० रूपयांपर्यंत आहेत. यामध्ये यंदा नऊवारी कापडा पासून तयार केलेल्या वस्त्रांना सर्वाधिक पसंती असल्याचे पहायला मिळत आहे. यासोबतच तयार रांगोळी तसेच ६ इंचापासून ३ फुटापर्यंत तयार गुढी देखील दाखल झाली आहे. उंच गुढी उभारण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये कायम असली तरी, वाढत्या गृहसंकुलांमुळे आणि जागेच्या मर्यादेमुळे लहान आकाराच्या गुढींना अधिक पसंती मिळत आहे. या तयार गुढींच्या किंमती १०० ते २५० रूपयांपर्यंत असल्याचे श्रृंगार वस्तु भंडारचे स्वप्निल तंटक यांनी सांगितले.
नववर्षानिमित्त शहरात पारंपारिक स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते. या स्वागतयात्रेत पारंपारिक वेशभुषा करून नागरिक सहभागी होत असतात. या नागरिकांसाठी यंदा शहरातील बाजारात खण साडी पासून तयार केलेले राजस्थानी फेटे दाखल झाले आहे. यामध्ये गुलाबी, केशरी रंगांच्या फेट्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच साखरेच्या गाठी बाजारात विक्रीसाठी आलेल्या आहेत. आकर्षक नक्षी, विविध रंग असलेल्या गाठींना ग्राहक खरेदी करत आहेत. विशेषतः केशरी रंगाच्या गाठींना सर्वाधिक पसंती आहे. या गाठी विविध वजनांत उपलब्ध आहेत. पिवळ्या, केशरी, पांढऱ्या, गुलाबी अशा चार रंगांत असलेल्या या गाठी २० ते ६० रुपयांपर्यंत आकारानुसार उपलब्ध आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, वाहन आणि घर खरेदीसाठीही नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्यामुळे शहरातील विविध दुकानांनी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. गुढीपाडव्याचा उत्साह आणि खरेदीचा जोर यामुळे ठाण्यातील बाजारपेठा सध्या फुलून गेल्या आहेत.