ठाणे : तलावांचे शहर म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या ठाणे शहरातील मुख्य तलाव परिसरातच घाणीचे साम्राज्य असल्याचे पहायला मिळत आहे. मासुंदा तलाव परिसरात सध्या उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने तलावाजवळ असलेल्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. तसेच नागरिकांसाठी बसण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची देखभाल केली जात नसल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असतात. तसेच मासुंदा तलाव हे ठाणे शहराचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी नौकाविहार, बैठक व्यवस्था, रोषणाई, लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळ असे विविध मनोरंजनाची साधने याठिकाणी आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्यासंख्येने पर्यटक येतात. परंतु ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षित पणामुळे मासुंदा तलाव परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. तलाव परिसरात असलेल्या पाणपोईजवळ उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने पाणपोईची दुरवस्था झाली आहे. तसेच परिसरात नागरिकांना बसण्यासाठी बांधलेले सिमेंटचे बाकडे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
काही नागरिक या ठिकाणी उंदरांना पाव आणि इतर पदार्थ खायला घालत असतात. त्यामुळे शिळे पदार्थ सर्वत्र पसरलेले असते. त्याचप्रमाणे नागरिकांकडून तलावातील पाण्यामध्ये देखील कचरा टाकला जातो. यामुळे काही वेळेस या तलावातील पाण्याचा दुर्गंध येत असतो. तसेच पावसाळ्यात मासुंदा तलाव परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तिथेच साचून राहते. याच पाण्यातून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागते. त्यात पदपथांवर गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गर्दुल्ले पदपथावरच शिळे अन्न फेकून देतात. काही वेळा पदपथांवरच विष्ठा केलेली असते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. गर्दीच्या वेळी या समस्येत अधिक भर पडते. स्वच्छ ठाणे अभियान राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने या भागातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे.
प्रतिक्रिया
तलावाच्या जवळ असलेल्या पाणपोईत अनेकदा पाणी उपलब्ध नसते, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. तसेच काही नागरिक तलावाच्या पाण्यात कचरा टाकत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्याचप्रमाणे तलावाजवळ फिरायला आलेल्या लोकांना भिक्षेकऱ्यांची मुले वारंवार पैसे मागण्यासाठी त्रास देत असतात. ही समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
अविनाश शिंदे, नागरिक