घोडबंदर येथील चितळसर-मानपाडा भागातील स्मशानभूमीत तातडीने नवीन सरणचौकटी, २४ तास सुरक्षा रक्षक पुरवण्यासह सर्वच सोयी-सुविधा देण्याचे आदेश ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिले.
गेल्या काही वर्षांपासून सुविधांच्या अभावामुळे मरणकळा आलेल्या स्मशानभूमीतील अनेक अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच स्मशानभूमीत २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याचे तसेच मृत्यू प्रमाणपत्र असेल तरच अंत्यविधी करा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय लहान मुलांच्या दफनविधीच्या जागेवर सांडपाणी सोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही दिल्याने आसपासच्या चाळवासीयांचे धाबे दणाणले आहे.
घोडबंदर येथील चितळसर-मानपाडा भागातील स्मशानभूमीतील चार सरणचौकटी मोडकळीस आल्या असून अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे आणि इतर साहित्य मृतांच्या नातेवाइकांना शहरातील अन्य स्मशानभूमीतून आणावे लागते. मृत्यूची नोंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात पायपीट करावी लागते. तसेच सुरक्षारक्षक पूर्णवेळ नसल्यामुळे तीन ते चारजणांनी एका व्यक्तीचा मृतदेह जाळण्याचा प्रकारही यापूर्वी घडला आहे.
याशिवाय, लहान मुलांच्या दफनविधीच्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते आणि याच जागेवर स्मशानभूमीला खेटून असलेल्या चाळीतील सांडपाणी सोडण्यात आले आहे. नव्याने वसलेल्या संपूर्ण घोडबंदर भागाकरिता असलेल्या या स्मशानभूमीतील दुरवस्थेचे विदारक चित्र ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याच पाश्र्वभूमीवर ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी बुधवारी अचानकपणे या स्मशानभूमीची पाहणी केली.
मात्र, या दौऱ्याची माहिती आधीच मिळाल्याने महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीतील कचऱ्याची विल्हेवाट लावून दफनविधीचा परिसर साफ केला होता. असे असले तरी या स्मशानभूमीतील मोडकळीस आलेल्या सरणचौकटी, लहान मुलांच्या दफनविधीच्या जागेवर शेजारच्या चाळीतून सोडण्यात आलेले सांडपाणी, अस्वच्छ पाणी, शौचालयाच्या तुटलेल्या काचा, स्मशानाच्या सुरक्षेसाठी एकच सुरक्षारक्षक, मृत्यूची नोंद करण्यासाठी महापालिका कर्मचारी नाहीत, असे चित्र महापौर मोरे यांना दौऱ्यातून दिसून आले. तसेच स्मशानभूमीच्या दुरवस्थेचे छायाचित्र आणि महापालिका प्रशासनाला वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती स्थानिक रहिवाशांनी महापौरांना दिली. दरम्यान, या दौऱ्यात स्मशानातील दुरवस्था पाहून त्यांनी तातडीने सर्वच सुविधा पुरविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई
लहान मुलांच्या दफनविधीच्या जागेवर सांडपाणी येऊ नये म्हणून त्यांची ड्रेनेज पाइप इतरत्र ठिकाणी हलवा आणि सांडपाणी सोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असे आदेशही दिले आहेत. तसेच लाकडाची वखार, पाण्याची सुविधा आणि इतर अन्य सुविधा तातडीने पुरवण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याशिवाय, स्मशानभूमीत २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याचे तसेच मृत्यू प्रमाणपत्र असेल तरच अंत्यविधी करा, अशा सूचनाही केल्या आहेत, अशी माहिती महापौर संजय मोरे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.