ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा १३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात करण्यात येतो.

दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात गुरूवार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असे २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.