ठाणे – घोडबंदरहून ठाणेच्या दिशेकडे एक मिक्सर ट्रक चालक सोमवारी प्रवास करत होता. वाघबीळ पुलाजवळ त्याचा ट्रक येताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकाल धडकून अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. परंतु, या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
एक अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रक चालक सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घोडबंदरहून ठाणेच्या दिशेने प्रवास करत होता. हा ट्रक चालक वाघबीळ पुलाजवळ येताच, चालकाते ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यावरील दुभाजकाला धडकला. या ट्रकचा पुढील भाग दुभाजकामध्ये अडकला होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु, ट्रक दुभाजकामध्ये अडकल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. ऐन सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. ते बराच वेळ या कोंडीत अडकून राहिल्यामुळे त्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशिर झाला.
या अपघाताची माहिती ठाणे शहर वाहतूक पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे अपघातग्रस्त वाहन वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी पंधरा ते वीस मिनिटात रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले. त्यानंतर, घोडबंदर – ठाणे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.