ठाणे : येत्या १ मे रोजी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदारसंघासह संपूर्ण ठाणे शहरभर लावलेल्या बॅनरवर पालिकेने कारवाई केली आहे. या बॅनरबाजीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. याच बॅनरवर कारवाई झाल्याने शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. या कारवाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेच्या कारभारावर टीका करत शहरभर लागलेल्या सत्ताधारी पक्षाच्या बॅनरला साधा हातही लावण्याची हिंमत पालिका अधिकाऱ्यांमध्ये नसल्याचे म्हटले आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभा घेण्यात येत आहेत. येत्या १ मे रोजी मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुल येथे वज्रमुठ सभा होणार आहे. मुंबई तसेच आसपासच्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर होणारी ही सभा महत्त्वाची मानली जात आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वज्रमुठ सभेला येण्याचे आवाहन करणारे बॅनर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदारसंघासह संपूर्ण ठाणे शहरभर गुरुवारी लावले. राष्ट्रवादीने पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोठ्याप्रमाणात बॅनर लावल्याचे दिसून आले. या बॅनरबाजीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
हेही वाचा – कल्याणमध्ये फुगे विक्रेत्याची चिमुकली हरवली, पादचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तीन तासात सापडली
वज्रमुठ सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ठाणे शहरात ३८ तर, ओवळा-माजिवाडा मतदारसंघात १६ बॅनर लावले. तर, मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदारसंघात २८ बॅनर लावले. किसननगर, शिवाजीवाडी, रहेजा, आनंदनगर, कोपरी बारा बंगला आणि भाजी मंडई या परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. शुक्रवार सकाळपासून पालिकेने हे बॅनर हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १ मे रोजी होणाऱ्या वज्रमूठ सभेसाठी इतर पक्षाप्रमाणेच शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आले होते. पण, आज सकाळपासून ठाणे महापालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी सगळे बॅनर्स काढत फिरत आहेत. त्याबद्दल ठाणे महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे. अनेक ठिकाणी इतर वेगवेगळ्या पक्षाचे आणि खासकरून सत्ताधारी पक्षाचे बॅनर लागलेले आहेत. त्याला साधा हातही लावण्याची हिम्मत त्यांनी केलेली नाही. आम्ही काल रात्री बॅनर्स लावले आणि आज सकाळपासून ठाणे महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी हे बॅनर उतरवायला सुरुवात केली. त्या अधिकाऱ्यांमध्ये आघाडीचे नाव भालेराव हे आहे. मी त्यांना स्वतः फोन केला पण, त्या फोनचेदेखिल त्यांनी उत्तर दिलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासनाने कसे वागाव, हे काही आम्ही आता त्यांना समजवायला नको. जसे त्यांना सांभाळता तस आम्हांलाही सांभाळून घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या संदर्भात अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हेही वाचा – कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील प्रवेशाची वेळ बदलण्याची नागरिकांची मागणी
अधिकाऱ्यांना बांगड्या पाठवणार
मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार यांचे शहरभर बॅनर लागतात. पण, त्यावर कारवाई करण्याची हिंमत पालिका अधिकारी दाखवत नाहीत. राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या विरोधी पक्षांचे बॅनर लागले तर त्यावर पालिका अधिकारी तात्काळ कारवाई करतात. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना बांगड्या पाठविणार आहे, असे राष्ट्रवादी, ठाणे शहराध्यक्ष, आनंद परांजपे म्हणाले.