ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईच्या कामांबद्दल कोणीही समाधानी नसल्यामुळे या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी देण्यात येत असून, यानंतरही या कामात सुधारणा झाली नाही, तर नवीन निविदा प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित ठेकेदारांना दिला आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यावर जितका दंड आकारला जातो, तितका दंड रस्ते स्वच्छ झाले नाहीतर आकारला जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. तसेच रस्ते सफाई आणि परिसर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी कंत्राटदारांनी गटनिहाय निरीक्षक नेमावेत आणि स्वतः रस्त्यावर उतरून कामाची गुणवत्ता तपासावी. त्यामुळे कामाच्या दर्जात निश्चित सुधारणा होईल, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते सफाईच्या गुणवत्तेबद्दल काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार, स्वच्छतेबद्दलची परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका वेगवेगळी पावले उचलत आहे. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील २६ गटांमध्ये काम करण्याऱ्या नऊ एजन्सी आणि त्यांचे ठेकेदार यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रस्ते सफाईच्या कामांच्या गुणवत्तेवरून ठेकेदारांना फैलावर घेतले. सध्या कार्यरत असलेले ठेकेदार मुदत वाढीवर काम करत आहेत. नवीन निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, ती पारदर्शक पद्धतीने केली जाईल. त्यातील अटी आणि निकष असे केले आहेत की ठेकेदारांना कमी दर्जाचे काम करता येणार नाही. या निविदा प्रक्रियेत टिकायचे असल्यास आताच कामात सुधारणा करण्याची गरज आहे, असेही बांगर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यात विविध प्रकल्पांच्या लोकार्पणाचा शनिवारी धडाका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कार्यक्रम

स्वच्छतेच्या कामात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. यामध्ये थोडीही कुचराई चालणार नाही. जो रस्ता किंवा विभाग ज्याच्याकडे आहे, त्याने त्या रस्त्याची पूर्ण जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. तसेच रस्ते सफाईचे काम करताना काही अडचण आल्यास, तक्रार असल्यास थेट मला सांगा. पण काम चांगले झाले नाही, तर कारवाईसाठीही तयार रहा, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू व्हायला पाहिजे. नागरिक घराबाहेर पडतील, तेव्हा त्यांना शहर स्वच्छ दिसायला हवे. शहरातील दुकाने, व्यापारी गाळे असलेले भाग रात्री स्वच्छ केले तर सकाळी तिथे कचरा दिसणार नाही. आठ ते साडेआठपर्यंत रस्ते सफाईचे काम पूर्ण करावे. त्याप्रमाणेच दुपारी १२ ते २ या काळात कामाची वेळ संपण्यापूर्वी आपापल्या रस्त्यावर फेरफटका मारून कुठे कचरा असेल तर तो साफ करावा, असे आदेशही त्यांनी दिले. महापालिकेने कामकाजात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्यामुळे, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची जाणीव ठेवूनच काम केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

ठेकेदारांचे पैसे देण्यात महापालिकेनेही काही वेळा उशीर केला आहे. यापुढे असे होऊ नये, यासाठी बँकेमध्ये स्वच्छता विषयक सर्व कामांची देयके अदा करण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते (एस्क्रो खाते) उघडावे. जेणेकरून भविष्यात ठेकेदारांची देयके देण्यात विलंब होणार नाही. एक महिन्याच्या देयकाएवढी जास्तीची रक्कम बँकेच्या या खात्यात नियमितपणे जमा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एका बाजूला सफाई कर्मचारी यांच्या कामात त्रुटी राहू नये याबाबत आपण दक्ष आहोत. त्याचवेळी त्यांचे गणवेश, दिल्या जाणाऱ्या सुविधा यामध्येही कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हेही पहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा – खोणी अंबरनाथ रस्त्यावरचे कोंडीचे शुक्लकाष्ट सुटणार; काकोळे येथील वालधुनीवरील पुलासह कॉंक्रिटीकरणासाठी ११६ कोटींची निविदा

ठाणे शहरात धुळीची मोठी समस्या आहे. रस्त्याच्या साईड पट्टीमध्ये सगळीकडे माती दिसते. अस्वच्छ रस्त्याचा परिणाम रस्त्यांच्या टिकावूपणावरही होतो, त्याचबरोबर प्रदूषणात भर पडते. हे लक्षात घेऊन एखादी टीम ही धूळ हटवण्याच्या कामी लावावी. कचरा करणे, थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे यासाठी महापालिकेने दंडाच्या रकमा वाढवलेल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र, मुळात रस्ते आणि परिसर स्वच्छ आहे असा दृश्य परिणाम नागरिकांना दिसू लागला तर त्यांच्या बेशिस्त वर्तनालाही आळा बसेल. शिवाय सफाई कर्मचाऱ्यांविषयी आत्मीयता वाढून ठाणेकर स्वतः रस्ते सफाईसाठी मदत करतील, अशी अपेक्षा आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane mnc commissioner abhijeet bangar warned contractors over road cleaning ssb