ठाणे: शहरातील मुख्य रस्त्यांची भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या दोन यंत्र वाहनांद्वारे दररोज सफाई करण्यात येत असून यामुळे रस्ते सफाई कामाचा दर्जा वाढत असल्याचा दावा करत ठाणे महापालिका प्रशासनाने आता अशी चार वाहने खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे. चारपैकी एक मोठे आणि तीन लहान यंत्र वाहने खरेदी करून त्याद्वारे शहरातील अंतर्गत मुख्य रस्ते आणि उड्डाण पुलाची सफाई करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची मानवी पद्धतीने सफाई करण्यात येते. अनेक रस्त्यांची योग्यप्रकारे सफाई होत नसल्याची टिका नागरिकांकडून सातत्याने होत आहे. हि बाब ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याही निदर्शनास आली होती. यानंतर त्यांनी ठेकेदारांना रस्ते सफाईच्या कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले होते. परंतु वारंवार सुचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे त्यांनी काही ठेकेदारांना नोटीसा बजावल्या होत्या. अखेर यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करण्याचा निर्णय आयुक्त बांगर यांनी घेतला होता. यानुसार दोन यंत्र वाहने पालिकेने भाडे तत्वावर घेतली आहेत.
हेही वाचा… कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेची मोर्चेबांधणी
गेल्या पाच महिन्यांपासून या वाहनांद्वारे शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई करण्यात येत आहे. एक वाहन दिवसभरात सुमारे ४० किमी रस्त्यांची सफाई करीत असून त्याचबरोबर मोठ्या रस्त्यांची सफाई जलदगतीने होत आहे. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम ही वाहने करतात. दोन्ही वाहनांद्वारे महिन्याला १५० ते २०० टन कचरा काढण्यात येतो. रस्ते सफाई कामाचा दर्जा वाढत असल्याचा दावा करत ठाणे महापालिका प्रशासनाने आता अशी चार वाहने खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे.
चारपैकी एक मोठे आणि तीन लहान यंत्र वाहने खरेदीचा विचार असून ही सर्व वाहने अत्याधुनिक असणार आहेत. शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यांची आणि पुलाची सफाई व्हावी, या दृष्टीने ही वाहने खरेदी करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते, शौचालये, स्वच्छता आणि सुशोभीकरण अशी कामे सुरू आहेत. याच मोहिमेतंर्गत ठाण्यातील रस्त्यांची सफाईसाठी हि वाहने खरेदी करण्याचा विचार आहे.