ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने हाती घेतलेली रस्ते नुतनीकरण आणि दुरुस्तीची कामे मे महिनाअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना, वातावरणातील बदलांमुळे पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते कामांवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यातच मुंबईसह ठाण्यातही पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या पावसामुळे रस्ते कामांवर परिणाम होण्याच्या भितीने पालिकेची चिंता वाढली आहे.
करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पालिकेवर आजही २२०० कोटी रुपयांचे दायित्व आहे. विविध विभागांच्या करातून जमा होणारा महसूल दायित्व कमी करण्यावर खर्च होत आहे. आर्थिक संकटात असलेल्या ठाणे महापालिकेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यात ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून २८३ रस्त्यांच्या नुतनीकरण आणि दुरुस्तीचे काम करण्यात येत आहेत. यामध्ये १०.४६ किमी लांबीचे काँक्रीट रस्ते, ५९.३१ किमी लांबीचे युटीडब्ल्युटी, ४६.७७ किमी लांबीचे डांबरी रस्ते, १९.१२ किमीचे मास्टीक पद्धतीने रस्ते तयार करण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ३१ मे पर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ही सर्व कामे गुणवत्तापूर्वक करण्याच्या सुचना आयुक्त बांगर यांनी दिल्या असून त्याचबरोबर गुणवत्तापूर्वक कामे होत आहेत की नाहीत, हे पाहण्यासाठी त्यांनी आयआयटी पथकाची नियुक्ती केली आहे. रस्ते कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य पार करण्यासाठी पालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युद्धपातळीवर रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. परंतु या कामात आता अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. काँक्रीट, डांबरीकरण किंवा मास्टीक पद्धतीने रस्ते कामे करताना अवकाळी पाऊस झाला तर काँक्रीटवर खड्डे पडण्याबरोबरच डांबर उखडण्याची भिती आहे. त्यातच मुंबईसह ठाण्यातही पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या पावसामुळे रस्ते कामांवर परिणाम होण्याच्या भितीने पालिकेची चिंता वाढली आहे.