ठाण्यातील राबोडी भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असली तरी दीड वर्ष उलटूनही या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी गुरुवारी शेख कुटुंबियांसोबत राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी केली.
राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. दीड वर्षांपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यातील एका आरोपीला उत्तर प्रदेश एसटीएफच्या पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींच्या अटकेनंतरही या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.
ठाणे: भररस्त्यात मनसे नेत्याची डोक्यात गोळी घालून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी यासाठी मनसे आणि भाजपाने सरकारकडे निवेदन देण्याबरोबरच मोर्चे आणि आंदोलने केली. परंतु त्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. त्यामुळे भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी गुरुवारी शेख कुटुंबियांसोबत राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी केली. सरकाराला निवदेने देण्याबरोबरच मोर्चे काढूनही मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासंबंधीचा तपास संथगतीने सुरु असून त्याचबरोबर तपास अधिकाऱ्याचीही बदली करण्यात आली आहे. यामुळे वेळ पडली तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली आहे.