ठाणे : जिल्ह्यातील ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांच्या एकूण ८०५ जागांकरिता राज्यभरातून ४६ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले असून याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिला उमेदवारांचे सुमारे नऊ हजार अर्ज आहेत.
राज्यात २०२२-२०२३ या वर्षासाठीची भरती प्रक्रिया यंदाच्या वर्षी होणार असून या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचण्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण या पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक अशा एकूण ८०५ जागांवर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील ११९ आणि ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांचा समावेश आहे. ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांपैकी ६६६ जागा या पोलीस शिपाई पदासाठी असतील. तर २० जागा वाहनचालक पदासाठी असणार आहेत. तसेच ग्रामीण पोलीस दलात ११९ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ७३, वाहन चालक पदासाठी ३८ आणि पोलीस वादक या पदासाठी आठ जागा आहेत.
हेही वाचा – डोंबिवलीत बेकायदा चाळींवर कारवाई
ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या एकूण ८०५ जागांसाठी ४६ हजार ६२४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ठाणे शहर पोलीस दलात सर्वाधिक म्हणजेच, ३९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे आठ हजार ४२ अर्ज आहेत. तर ग्रामीण पोलीस दलात ७ हजार १९ जणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण १ हजार १५ इतके आहे.
ठाणे शहर पोलीस दलाची मैदानी चाचणीची प्रक्रिया ठाण्यातील साकेत मैदानात होणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणीची प्रक्रिया मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मैदानामध्ये पार पडेल. मैदानी चाचणी दरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तैनात असतील.
ठाण्यातील साकेत मैदान आणि परिसरात १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस कर्मचारी आणि ७० मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पावसाळ्यात ही भरती प्रक्रिया होणार असल्याने उमेदवारांसाठी मैदानात मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच एखादा उमेदवार त्याचे छायाचित्र आणण्यास विसरल्यास त्याच्यासाठी छायाचित्रकार आणि प्रत काढण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे. – संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस.
हेही वाचा – कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी
मुंब्रा येथे भरती प्रक्रियेसाठी आदल्या दिवशी अनेक उमेदवार येतील. त्यांच्या सुविधेसाठी मैदानात मंडप उभारण्यात आला आहे. त्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी ३५० अधिकारी कर्मचारी तैनात असतील. – डाॅ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण.