ठाणे – जिल्ह्यातील नागरिक शिधा पत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, पत्ता बदलणे अशा विविध कामांसाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील शिधा वाटप कार्यालयात येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयातील एमटीएनएल इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होत असल्याचा प्रकार घडत आहे. याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर होत असून कर्मचारी वर्गही यामुळे त्रस्त झाला आहे. तर, इंटरनेट सुविधा ठप्प होत असल्यामुळे नागरिकांच्या कामासही विलंब होत आहे. यासंदर्भात, एमटीएनएल विभागाला कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करुनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या शिधावाटप कार्यालय ४९ फ ठाणे लोकाभिमुख कार्यालय आहे. या कार्यालयात शिधापत्रिकेसंबधितील ऑनलाइन तसेच ऑफलाइन कामे सातत्याने चालू असतात. नवीन शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंद करणे, नाव कमी करणे – वाढविणे, शिधापत्रिकेत फेरफार करणे त्यासह शिधापत्रिका रद्दचा दाखला देणे इत्यादी कामे या कार्यालयात ऑनलाइन केली जातात. तसेच या कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाला वेळोवेळी महत्वाचे अहवाल ई-मेलद्वारे पाठविण्याचे काम करण्यात येते. या कामाच्या दरम्यान इंटरनेट सुविधा बंद झाली की, कामासाठी वापरले जाणारे संकेतस्थळ सुरु होत नाही. परिणामी कामात अडथळा निर्माण होतो. या कार्यालयात शिधापत्रिकेच्या कामासाठी ठाणे, घोडबंदर, ऐरोली रबाळे या परिसरातील नागरिक सकाळी १० वाजल्यापासून येतात. यापैकी बहुतांश नागरिकांचे काम हे ऑनलाईनमार्फत करायचे असते. परंतु, गेले काही दिवसांपासून कार्यालयातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा वारंवार पूर्णपणे बंद होत असल्यामुळे कार्यालयीन कामाचा खोळंबा उडाल्याचे चित्र आहे. परिणामी, कार्यालयीन कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तर, नागरिकांचे काम होण्यासही विलंब होत असून त्यांच्याकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. यासंदर्भात, एमटीएनएल विभागास भ्रमणध्वनीद्वारे तसेच पत्रव्यवहार करुन कळविण्यात येते, तरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तसेच शिधा वाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणली आहे. परंतू, तरीही इंटरनेट सुविधेत खंड पडत आहे. इंटरनेट सुविधा सुरळित सुरु करावी अशी मागणी शिधावाटप कार्यालयाती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जोर धरु लागली आहे.

हेही वाचा – बहिणीशी बोलतो म्हणून उल्हासनगरमध्ये तरुणाला लोखंडी सळईने मारहाण

हेही वाचा – दिव्यामधील महापालिका शाळेतील ४४ विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळेतून देण्यात येणाऱ्या खिचडीत मृत पाल आढळली

नागरिकांचे काम वेळेत पूर्ण करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. परंतु, इंटरनेट सुविधा वारंवार ठप्प होत असल्यामुळे ते शक्य होत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढतो. पण, त्यासह नागरिकांचे काम आडून राहिल्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कार्यालयात इंटरनेटची अखंडित सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरुन कार्यालयातील ऑनलाईन कामे सुरळितपणे करणे शक्य होईल. – सु.रा. डुंबरे, शिधावाटप अधिकारी, शिधावाटप कार्यालय क्रमांक ४१ फ (ठाणे)