ठाणे महापालिकेत कामावर उशीरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी वहीत तशी नोंद करण्याचा आणि सलग तीन दिवस उशीरा आल्यास एक दिवसांच्या सुट्टीची नोंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. तसेच या नियमाच्या कचाट्यात अडकू नये म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून हजेरी वहीत वेळेच्या खोट्या नोंदी केल्या जाण्याची शक्यता असून ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाकडून कामावर येण्याच्या ठरवून दिलेल्या वेळेनंतर लगेचच हजेरी वही ताब्यात घेतली जात आहे. या नियमाची अंमलबजावणी करत आयुक्त अभिजीत बांगर यांनी एकप्रकारे लेटलतीफ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुुळात सुरु आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा भागशाळा मैदानात वाहन कर्ज मेळावा

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर ७ हजार १९३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात शिक्षण मंडळ विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त ठाणे परिवहन सेवा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. ठाणे महापालिकेत सकाळी ९.३० ते ६.३० अशा कामाच्या वेळ आहेत. त्यात अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला कामावर येण्याच्या वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. परंतु अनेक अधिकारी आणि कर्मचारी दररोज वेळेत येत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होतो. आधीच पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून त्यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर दुहेरी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, लेटलतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे सर्वांच्या कामावर परिणाम होऊन त्याचा फटका ठाणेकरांना बसतो. अनेकदा ठाणेकर सकाळी महापालिका मुख्यालयात कामानिमित्त येतात. परंतु त्यावेळेत अधिकारी-कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांना त्याठिकाणी त्यांची वाट पहात उभे रहावे लागते. कामावर उशीरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी वहीत तशी नोंद करण्याचा आणि सलग तीन दिवस उशीरा आल्यास एक दिवसांच्या सुट्टीची नोंद करण्याचा शासनाचा नियम आहे. या नियमाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे लेटलतिफ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे फावले जात होते. नवनिर्वाचित आयुक्त अभिजीत बांगर यांनी या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले असून त्यानुसार या विभागाने गुरुवारपासून या नियमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यात पहिल्या दिवशी ३० टक्के कर्मचारी कामावर उशीरा आल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिका शहर अभियंता पदी अर्जुन अहिरे

कामावर उशीरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी वहीत तशी नोंद करण्याचा आणि सलग तीन दिवस उशीरा आल्यास एक दिवसांच्या सुट्टीची नोंद करण्याचा शासनाचा नियम आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर वेळेत यावे म्हणून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. करोना काळात महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी असणारी बायोमेट्रीक यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. परंतु आता करोना कमी झाला असल्यामुळे ही यंत्रणा लवकरच सुरु केली जाणार आहे.- मारुती खोडके ,उपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader