ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘मिशन शंभर दिवस’ या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाल्याने पालिकेची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे, सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील आणि नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावले उचलता येतील याचा विचार करावा, असे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी कै. अरविंद पेंडसे सभागृहात पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारे सादरीकरण यावेळी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘मिशन शंभर दिवस’ या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे, असे सांगत अंतिम मूल्यमापन १७ एप्रिल ते २८ एप्रिल या काळात होणार असल्याचे आयुक्त राव यांनी बैठकीत सांगितले. प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे, सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावले उचलता येतील याचा विचार करावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीने ‘मिशन शंभर दिवस’ या उपक्रमांतर्गत सर्व विभागांनी काम करावे. नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल यादृष्टीने नियोजन केले जावे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे. तसेच, या मूल्यांकनाचे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीत, महापालिका आयुक्त राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावाही घेतला. मार्चअखेर पर्यंतचा कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही आयुक्त राव म्हणाले.

सर्व अधिकाऱ्यांनी घेतली ‘माझी वसुंधरा ई प्रतिज्ञा’

राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ मोहिमेतर्गत सर्व नागरिकांनी ई-प्रतिज्ञा घेणे अपेक्षित आहे. त्याची सुरुवात पर्यावरण विभागाने विविध विभागांच्या मदतीने केलेली आहे. त्याच दृष्टीने सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या मोबाईलवर ई प्रतिज्ञा घेतली. नागरिकांनीही
https://majhivasundhara.in/en/lets-pledge या वेबसाईटवर ई-प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी केले.

शिक्षण विभागाच्या विशेषांकाचे प्रकाशन

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचा आढावा घेणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी हा विशेषांक आयुक्त राव यांच्याकडे सुपूर्द केला.