कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाच्या ठेकेदाराने १ कोटी ८८ लाख ११ हजार १६८ रूपयांचे भाडे पालिकेकडे जमा केले नव्हते. ही रक्कम भरण्यासाठी पालिकेने वारंवार नोटीसा पाठवूनही ठेकेदार भाडे भरत नव्हता. यामुळे गुरुवारी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीप कपोते वाहनतळाचा ठेकेदाला बाजूला करत वाहनतळ ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.
मागील फेब्रुवारीमध्ये या वाहनतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. मे. कुमार एन्टरप्रायझेस, मे. श्री गुरूदत्त एन्टरप्रायझेस या दोन खासगी एजन्सी संयुक्त भागीदारीमधून हे वाहनतळ चालवित होत्या. फेब्रुवारी २०२४ पासून पहिल्या तीन महिन्यांसाठी ९४ लाख ५ हजार ५८४ रूपये दरमहा भाड्याने हे वाहनतळ ठेकेदारांना पालिकेने चालविण्यास दिले होते. या वाहनतळामध्ये सुमारे २ हजार ७८० दुचाकी उभी करण्याची व्यवस्था आहे. सुरुवातीचे दोन महिन्याचे भाडे ठेकेदारांनी नियमितपणे पालिकेला दिले. मे ते नोव्हेंबर या कालावधीतील १ लाख ८८ हजार रूपयांचे भाडे भरण्यास ठेकेदार टाळाटाळ करत होते. ही रक्कम भरणा करावी म्हणून पालिका मालमत्ता कर विभागाने ठेकेदारांना नोटिसा पाठविल्या होत्या. ठेकेदार त्यास दाद देत नव्हता.
हेही वाचा >>>डोंबिवलीत सारस्वत बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी गुन्हा
ठेकेदार भाड्याची थकित रक्कम भरणा करत नसेल तर त्या वाहनतळाचा ताबा पालिकेने घेऊन ते चालविण्यास सुरूवात करावी. तसेच ठेकेदारांचे या वाहनतळावरील नियंत्रण काढून टाकावे असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, मालमत्ता विभाग उपायुक्त रमेश मिसाळ यांना दिले. वाहनतळाचा ताबा घेण्यासाठी उपायुक्त प्रसाद बोरकर, साहाय्यक आयुक्त सविता हिले, नियंत्रण अधिकारी प्रसाद ठाकुर, अधीक्षक जयराम शिंदे, प्रशांत धीवर यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. गुरुवारी दुपारी पालिकेचे विशेष पथक पोलीस बंदोबस्तात दिलीप कपोते वाहनतळावर पोहचले. सुरूवातीला ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी वाहनतळाचा ताबा देण्यास नकार दिला. ठेकेदाराच्या महिला कर्मचारी दाद देत नसल्याने उपायुक्त मिसाळ यांनी उपायुक्त अतुल झेंडे यांना संपर्क करून महात्मा फुले पोलीस ठाण्यातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविला. पोलिसांनी आक्रमक कारवाई करून ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना वाहनतळातून बाहेर काढले. उपस्थितांच्या समक्ष पंचनामा करून पालिकेने कपोते वाहनतळाचा ताबा घेतला.
हेही वाचा >>>ठाण्यात निधीअभावी शंभरहून अधिक सीसीटिव्ही कॅमेरे बंद
शुक्रवारपासून पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांनी चक्राकार पध्दतीने या वाहनतळावरील नियंत्रणाचे काम सुरू केले आहे. अधिक माहितीसाठी ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून संपर्काला प्रतिसाद मिळाला नाही.
कपोते वाहनतळ भाड्याची रक्कम ठेकेदाराने थकवली होती. ठेकेदाराचा करारनामा संपुष्टात आणण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. या दोन्ही ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकून त्यांना अन्य प्राधिकरणांकडे व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.- रमेश मिसाळ ,उपायुक्त, मालमत्ता विभाग.