ठाणे : हवा प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कठोर पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून हवा प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दोन लाख ८० हजारांचा दंड वसुल केला आहे. याशिवाय, हवा प्रदुषणप्रकरणी आतापर्यंत १५१ जणांना नोटीसा नुकत्याच बजावल्या असून या नोटीसानंतरही संबंधितांकडून हवा प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे पालन केले जाते की नाही, याची पाहाणी प्रशासनाने सुरू केली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे पालन होताना पथकाला दिसून आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपुर्वी खालावला होता. हवा प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रदुषण नियंत्रण विभागाने २८२ बांधकाम ठिकाणांची पाहाणी केली होती. यामध्ये नियमावलीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३९ बांधकाम व्यवसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नियमावलीचे तात्काळ पालन झाले नाही तर, त्यांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश देईल असा इशारा देण्यात आला होता. तर, १५१ बांधकाम व्यवसायिकांच्या कामात काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे. नोटीस बजावल्यानंतर या सर्वांनी हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत का याची पाहाणी पालिका प्रदुषण नियंत्रण विभाग आणि शहर विकास विभागाच्या पथकाने संयुक्तपणे सुरू केली आहे. आतापर्यंत ८५ ठिकाणी पथकाने पाहाणी केली असून याठिकाणी संबंधितांकडून ग्रीन कापड आणि पत्र्याचे कंपाउंड, पाणी फवारणी यंत्र, अशा उपायोजना करण्यात आल्याचे पथकाला दिसून आले आहे. काही ठिकाणी किरकोळ उपाययोजना राहिलेल्या असून त्याची पुर्तता करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
हवा प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक जाळण्यास प्रशासननाने बंदी घातली आहे. तसेच, हॉटेल, तंदूर, रेस्टॉरंट, बेकरी येथे जळाऊ लाकूड वापरण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, ठाणे महापालिकेतर्फे प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय साधून ठाण्याच्या वेशीवर राडारोडा वाहतूक करणाऱ्या व ताडपत्री नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या ठिकाणांचा वाहतूक परवाना असल्याशिवाय अशा वाहनांना ठाणे महापालिका हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. उघड्यावर कचरा जाळण्याप्रकरणी २० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. हवा प्रदुषणास कारणीभूत असल्याप्रकरणी १ लाख ७३ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच ताडपत्रीविना आणि परवानगीविना राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून दक्षता पथकाने ९० हजारांचा दंड वसुल केला आहे.
हेही वाचा…कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून
१७ बेकरीला नोटीस
ठाणे महापालिकेच्या पथकाकडून शहरातील ४४ बेकरींची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये २७ ठिकाणी गॅस जोडणी असल्याचे आढळून आलेले आहे. उर्वरीत १७ ठिकाणी गॅस जोडणी आढळून आलेली नसून येथे लाकूड, कोळशाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अशा बेकरी विक्रेत्यांना प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून पुढील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतली जाणार असून त्यात त्यांनाही प्रदुषण रोखण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.