ठाणे महापालिका आयुक्तांनी बजावली सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस
ठाणे : कळवा परिसरात बेकायदा इमारतींच्या उभारणीची कामे सुरु असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात ठाणेकर यांना स्पष्टीकरण देण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
बेकायदा बांधकामांच्या तक्रारींवर वेळीच कारवाई केली जात नसल्याने बांधकामे वाढत असून त्याचबरोबर दिखाऊ व जुजबी कारवाई करण्यात येत असल्याने या बांधकामांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे आयुक्त बांगर यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भुमाफियांकडून बेकायदा इमारती उभारण्यात येत आहेत. या बांधकामांवर कारवाई होत नसल्याने पालिकेच्या कारभारावर टिका होते. राज्याच्या विधानसभेतही शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित झाला होता. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या भागात बेकायदा बांधकामे होत आहेत, तेथील सहाय्यक आयुक्तांवर ते कारवाई करीत आहेत. त्यांनी काही महिन्यांपुर्वी दिवा भागात भुमाफियांकडून उभारण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांना निलंबित केले होते. या कारवाईच्या निमित्ताने बेकायदा बांधकामाला अभय दिले तर निलंबनाची कारवाई होईल, असाच संदेश त्यांनी इतर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दिला होता. असे असतानाही कळव्यात मात्र बेकायदा बांधकामे सुरुच असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त होताच आयुक्त बांगर यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत तरुणावर चाकूने हल्ला
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. कळवा प्रभाग क्षेत्रातील जय भारत मैदानाच्या शेजारी आठ मजली इमारत अवघ्या चार महिन्यांचे कालावधीमध्ये उभी राहिली आहे. त्याचबरोबर कळवा भागात बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरु आहेत. अशा तक्रारी नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि इतर माध्यमातून महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. अशा सर्व तक्रारी आपल्याकडे पाठवूनही त्यावर वेळीच कारवाई झालेली नाही. त्याचप्रमाणे कळवा प्रभाग क्षेत्रातील कांदळवन क्षेत्रामध्ये भराव टाकून अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व बाबी निदर्शनास आणून देऊनही त्याठिकाणी संपूर्ण निष्कासनाची कारवाई झालेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे बांगर यांनी म्हटले आहे. नगरविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार बेकायदा बांधकामांना वेळीच प्रतिबंधित करणे अथवा निष्कासनाची कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांचीच आहे. या बांधकामांप्रकरणी आपणाविरुध्द शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात येवू नये ? याबाबत तीन दिवसांत खुलासा सादर करावा. या मुदतीत खुलासा सादर झाला नाहीतर याप्रकरणी आपणास काहीही निवेदन करावयाचे नाही, असे गृहित धरुन आपल्याविरुध्द शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले आहे.