ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच काळ्या यादीत टाकले;ठाणे महापालिका आयुक्तांची कारवाई
ठाणे : असामाधानकारक नालेसफाईप्रकरणी दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही कामात कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे.जे. एस इन्फ्राटेक या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या ठेकेदाराला पुढील तीन वर्षाकरिता ठाणे महापालिकेत कुठल्याही प्रकारच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णयही आयुक्त बांगर यांनी घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची पावसाळ्यापुर्वी नालेसफाई करण्यात येते. पावसाळ्यात नाल्यामध्ये पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून ही नालेसफाई करण्यात येते. यंदाही महापालिकेकडून अशाचप्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. नालेसफाईची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आयुक्त अभिजीत बांगर हे आग्रही आहेत. तरिही शहरात अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून योग्यप्रकारे नालेसफाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिक, लोकप्रतिनिधी करीत आहेत. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईची कामे चांगल्या दर्जाची होत नसल्याची बाब महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. येथे नालेसफाई व्यवस्थित पद्धतीने होत नसल्याबाबत नागरिकांनीही तक्रारी केल्या होत्या. याबाबत मे.जे. एस इन्फ्राटेक या ठेकेदाराला नोटीस काढून १ लाख १५ हजारांचा दंड आकारण्यात आला होता. या कारवाईनंतरही वारंवार नोटीसा देऊनही ठेकेदाराच्या कामात कोणतीही सुधारणा झाली नाही. आयुक्त बांगर यांनी केलेल्या पाहाणी दौऱ्यातही त्यांना हे चित्र दिसून आले आहे. असमाधानकारक नालेसफाईप्रकरणी काळ्या यादीत का टाकण्यात येवू नये याचा खुलासा संबंधित ठेकेदाराकडून मागविण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले होते. परंतु ठेकेदाराने कोणताही समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यामुळे कामामध्ये सुधारणा करण्यात पूर्णत: अपयशी ठरल्याप्रकरणी मे. जे. एस इन्फ्राटेक या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आयुक्त बांगर यांनी घेतला आहे. तसेच त्याला पुढील तीन वर्षाकरिता ठाणे महापालिकेत कुठल्याही प्रकारच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णयही त्यांनी घेतल आहे.
चांदीवाला कॉम्प्लेक्स ते एस.टी वर्कशॉप, के- व्हिला ते सरस्वती शाळा, साकेत ब्रीज खाडीमुख, कॅसल मिल ब्रीज ते आनंद पार्क ब्रीज येथील नाल्यामधील गाळ त्याच नाल्यात गोळा केलेला असून अद्याप बाहेर काढलेला नसल्याचे आयुक्तांना दौऱ्यात दिसून आले. ऋतु पार्क ते बी.एम.सी पाईपलाईन, बी.एम.सी पाईपलाईन ते श्याम अपार्टमेंट येथील नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू असल्याचे तर पंचगंगा ते साकेत रोड ब्रीज नालेसफाईचे काम अद्याप सुरू केले नसल्याचेही आढळून आले. तसेच ऋतुपार्क ते बी.एम.सी पाईपलाईप, ऋतुपार्क ते सर्व्हिस रोड लोखंडी पूल, वंदना बस डेपो, सेंट्रल कॉम्प्लेक्स महापालिका भवन गेट नं. ३, उथळसर प्रभाग समिती गेटजवळ, सेंट्रल मैदान, आर.टी. ओ. कार्यालयासमोर, ट्रॅफिक चौकी, उर्जिता हॉटेलजवळ, बाटा कंपाऊंड सर्व्हिस रोड, खोपट सिग्नल पदपथावर, कोलबाड, बँक ऑफ बडोदाजवळ, विशाल टॉवर, जाग माता मंदिर, सुमेर कॅसल सोसायटी गेट, गोकुळनगर, जरीमरी मंदिर, हरदास नगर सर्व्हिस रोड, पंचगंगा सोसायटी गेट, मखमली तलाव पदपथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते गीता सोसायटी पदपथ येथे नालेसफाई दरम्यान काढलेला चिखल व गाळ उचलला नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. यामुळेच आयुक्तांनी ठेकेदारावर कारवाई केली आहे.