ठाणे : कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तसेच आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी सौजन्याने वागण्याच्या सल्ला देत यासंबंधी तक्रार आली तर कारवाई करेल, असा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एनआयसीयूच्या ३० खाटांची सुविधा एक महिन्याच्या आत सुरू करावी, महापालिकेच्या एकूण सहाप्रसूतीगृहांपैकी कोपरी येथील प्रसूतीगृहातील आप्तकालीन सिझेरियनची सुविधाही एक महिन्याच्या आत सुरू झाली पाहिजे आणि कौसा येथील सार्वजनिक-खाजगी तत्वावरील १०० खाटांचे रुग्णालय प्राधान्याने सुरू करावे, असे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

हेही वाचा >>>आशा स्वयंसेविकांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भाऊबीजेची भेट

ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेऊन त्यात आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. या बैठकीला उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश शर्मा, उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हमरसकर, आरसीएच अधिकारी डॉ. राणी शिंदे, क्षयरोग आणि कोविड समन्वयक डॉ. प्रसाद पाटील, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर हे अधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एनआयसीयूच्या ३० खाटा आहेत. त्यापैकी काहीच खाटा वापरात आहेत. त्यामुळे या सर्व ३० खाटा एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले. पालिकेच्या प्रसूतीगृहात एकूण किती प्रसूती होतात, त्यातील सिझेरियन किती होतात, याचा अहवाल आयुक्तांनी मागितला. त्याचबरोबर, सर्व प्रसृतीगृहात एनआयसीयू सुरू करण्याचे कालबद्ध उद्दिष्ट आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहे. या प्रसृतीगृहात जागा नाही, असे शक्यतो होऊ नये.  प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला माघारी पाठविण्याची वेळ येऊ नये. तसेच, सिझेरियन किंवा मुदतपूर्व प्रसूती यासाठी त्यांना बाहेर जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक प्रसूतिगृहात रुग्णवाहिका हवीच, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>ठाण्यात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आगीच्या घटना वाढल्या; एकाच दिवसात ११ ठिकाणी आग

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांशी सौजन्याने वागणे हे आपले कर्तव्य आहे. रुग्णावर आवाज चढवला अशी तक्रार आली, तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. त्याचप्रमाणे, रुग्णांने किंवा नातेवाईकांनी डॉक्टर किंवा कर्मचारी यांच्याशी गैरवर्तणूक केली तर तत्काळ पोलीस तक्रार करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. रुग्णालयात आलेल्या रुग्णाला अनेक रांगांमधून फिरावे लागते. केस पेपरची रांग, ओपीडीची रांग, टेस्ट – सोनोग्राफी, एक्सरे, फार्मसी यांची रांग यातून रुग्णाला स्वतःला जावे लागते. गरोदर माता, वृध्द नागरिक यांची अशावेळी मोठी गैरसोय होते. त्यामुळे या रांगा कमी कशा करता येतील. जास्तीचे टेबल लावून, अधिक काऊंटर उघडून यातून मार्ग काढता येतो का, हे पाहावे, असे आदेश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णाला उपचारासाठी बाहेर पाठविण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी. अपवादात्मक परिस्थितीमध्ये बाहेर पाठवावे लागलेच तर, आपल्या रुग्णवाहिकेतून पाठवले जाईल. ज्या रुग्णालयात पाठवतो आहोत, तिथे बेड उपलब्ध आहे का, याची खात्री करूनच रुग्णाला पाठवावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत. ठाण्यातील १२ ते १८ या वयोगटाचे १०० टक्के लसीकरण हे आपले लक्ष्य आहे. दिवाळीची सुटी संपल्यानंतर शाळावार टीम बनवून या वयोगटाचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या संख्येवर लक्ष ठेवून त्याचा अभ्यास सुरू ठेवण्याच्या सुचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही. आरोग्य सेवा दर्जेदार आणि गतिमान असावी, एकाही रुग्णाला उपचाराअभावी माघारी जाण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता घेण्यात येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

वाडियातील लॅब लवकर सुरू करा

ठाणे शहराला आणखी एका मध्यवर्ती पॅथॉलॉजी लॅबची गरज आहे. त्यामुळे, सी आर वाडिया रुग्णालयातील लॅबची कामे ताबडतोब मार्गी लावण्यास प्राधान्य द्यावे. या मध्यवर्ती पॅथॉलॉजी लॅबमध्ये पालिकेची सर्व ३० नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, सर्व आपले दवाखाने यातून नमुने गोळा करून तपासणीसाठी येतील, असे आयुक्त म्हणाले. तसेच, शहरात ४० आपला दवाखाना आहेत. तेथे किती रुग्ण येतात, त्याचे काम कसे सुरू आहे, याचा अहवाल देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

Story img Loader