कळव्यातील नाटय़गृहाचा सोस आवरता?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : शहरातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहांना उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करावा लागत असताना महापालिका आयुक्तांनी गुरुवारी वागळे इस्टेट भागात आणखी एका नाटय़गृहाचा पांढरा हत्ती पोसायची घोषणा करून सर्वानाचा अचंबित केले. हे करत असताना तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या कळवा परिसरातील नाटय़गृहाचा यंदाच्या अर्थसंकल्पात उल्लेखही नाही. त्यामुळे कळव्यात नाटय़गृह उभारण्याचा सोस महापालिकेने आवरता घेतला का, अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे.

ठाणे शहरातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या नाटय़गृहांना किती प्रतिसाद मिळतो, असे प्रश्न गेल्या काही वर्षांपासून उपस्थित होत असतानाच तत्कालीन आयुक्त  संजीव जयस्वाल यांनी अर्थसंकल्पात कळवा परिसरात नाटय़गृह उभारणीची घोषणा केली होती. जयस्वाल यांची ही घोषणा कागदावरच राहिली. असे असताना यंदाच्या अर्थसंकल्पात वागळे इस्टेट भागात नवे नाटय़गृह उभारणीची घोषणा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघात कळवा परिसर येतो. तर, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघात वागळे इस्टेट परिसर येतो.

कळवा, मुंब्रा भागाची निराशा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात यंदाच्या अर्थसंकल्पात एकही लक्षवेधी प्रकल्प आखण्यात आलेला नाही. वागळे इस्टेट तसेच दिवा भागात काही नवे प्रकल्प आखले गेले आहेत. दरम्यान अर्थसंकल्प हा काही प्रभाग समितीनिहाय मांडला जात नाही. शहरात जी विकासकामे सुरु आहेत तसेच इतरही नियमित कामे आहेत. ती संपूर्ण महापालिका क्षेत्रात केली जात आहेत, असा दावा आयुक्तांनी केला.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

कलादालन, गडकरी रंगायत आणि डॉ. काशीनाथ नाटय़गृहातून पालिकेला २०१८-१९ या वर्षांत दोन कोटी ५० लाखाचे उत्पन्न मिळाले होते तर, ९ कोटी ३० लाखांचा खर्च झाला आहे. २०१९-२० या वर्षांत तीन कोटी ७ लाखाचे उत्पन्न मिळाले होते तर, ८ कोटी ३२ लाखांचा खर्च झाला आहे. २०२०-२१ या वर्षांत १९ लाख ३२ हजाराचे उत्पन्न मिळाले होते तर, ६ कोटी २५ लाखांचा खर्च झाला आहे. २०२१-२२ या वर्षांत एक कोटी १४ लाखाचे उत्पन्न मिळाले होते तर, १० कोटी ३६ लाखांचा खर्च झाला आहे.

घनकचरा व्यवस्थापन

’ डायघर येथे पहिल्या टप्प्यात १२०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार.

’ बैठी घरे, डोंगर उतारावरील झोपडपट्टय़ा, दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दररोज २०० टन कचऱ्याच्या संकलनाकरिता ५० ई-रिक्षा  खरेदी करण्याचे नियोजन .

’ कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी भंडार्ली येथे भरावभूमी उभारण्याचे नियोजन

’ १०० किलोपेक्षा कमी कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ा, इमारती, बैठय़ा चाळींना कंपोस्ट निर्मितीसाठी पालिकेमार्फत टाक्या.

कचरा संकलनासाठी कचरा वेचकांची मदत

ज्या भागात कचरा संकलनाकरिता कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही, अशा भागांमध्ये घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी कचरा वेचक, स्थानिक महिला मंडळ व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून भौगोलिक परिस्थितीनुसार घरांचे गट तयार करून अशा संस्थांच्या माध्यमातून घरोघरी वर्गीकृत कचरा संकलनाचे काम करण्यात येणार आहे.  याकरिता ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

शिक्षणासाठी

’ डब्ल्यूआरआय स्कूल झोन सेफ्टी मेजर्स अंतर्गत शाळा परिसरात सुरक्षा उपाय योजनासाठी १० कोटी रुपये तरतूद.

’ महापालिका शाळांच्या मजबुतीकरण व दुरुस्तीसाठी २० कोटी तरतूद प्रस्तावित.