ठाणे : ठाणे महापालिकेच्या भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीच्या संरक्षक भिंतीलगत बांबूचे वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटे तयार करण्यात येणार आहेत. यासंबंधीची घोषणा ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी केली आहे. यामुळे कचराभुमी परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार असल्याचा दावा करत स्थानिक नागरिकांना दुर्गंधी तसेच कचरा वाहतुकीचा त्रास होणार नाही याची दक्षता काटेकोरपणे घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ठाणे महापालिकेकडे स्वत:ची कचराभुमी नव्हती. यामुळे शहरात कचरा समस्या निर्माण होत आहे. ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला भिवंडी येथील आतकोली भागात कचराभुमीसाठी ३४ हेक्टर इतकी जागा दिली आहे. याठिकाणी पालिकेकडून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे. या जागेवर ठाणे महापालिकेतर्फे घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. या जागेवर गौण खनिजाचे उत्खनन झालेले असून आता या जागेचा विकास महापालिकेमार्फत होत आहे.

या कचराभुमीच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षक भिंत, सुरक्षा कक्ष, पोहोच रस्ता, २२ एकरचे सपाटीकरण, बांबूचे वन या कामांसाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे काम महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. संपूर्ण भूखंडाला चार किंमीची संरक्षक भिंत, त्याला लागून अडीच मीटर अंतराचे बांबूचे बन, कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी १२ एकर आणि ग्रॅस निर्मितीसाठी १० एकर अशा एकूण २२ एकर जागेचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. त्याचसोबत, साईट कार्यालय, सुरक्षा कक्ष, शौचालय, २५० मीटरची मलवाहिनी, १५० किमींचा पोहोच रस्ता आणि त्यालगत गटार ही कामे करण्यात येणार आहेत.

या कामांची ठाणे महापालिका आयुक्तांनी बुधवारी पाहाणी करत ही सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक वीज वाहिनीचे कामही जलद करावे, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आणि शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

हरीत बेटे तयार करा

आतकोली कचराभूमीच्या पूर्ण परिघावर बांबूचे बन तयार करण्यात येणार आहे. त्याच जोडीला या पावसाळ्यात कचराभूमीत ठिकठिकाणी हरित बेटे तयार करावीत. त्याचा योग्य अभ्यास करून कार्यवाही करावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रवेशद्वार, स्थानिक कार्यालय या परिसरातही हरित पट्टा तयार करावा. येथील कचऱ्याचे पूर्ण गांभीर्याने व्यवस्थापन केले जात आहे, हे जाणवले पाहिजे. त्यामुळेच, कचरा टाकला की त्यावर मातीचा थर द्यावा. दुर्गंधीनाशक आणि जंतूनाशक रसायनाची प्रभावीपणे फवारणी करावी. तसेच, कचरा आणि मातीचा विशिष्ट थर तयार झाल्यावर तेथे वृक्षारोपण करावे. या सर्व गोष्टी कटाक्षाने कराव्यात, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.