करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची शुक्रवारी तातडीने बैठक घेतली. दिवसाला दोन हजारपर्यंत करोना चाचण्या करणे, कळवा येथील महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे स्थानक परिसरात करोना चाचण्या सुरू करण्याचे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले. तसेच आरोग्य यंत्रणांचे परिक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
हेही वाचा- भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल
करोनाचा प्रादुर्भाव चीनमध्ये वाढू लागल्याने केंद्र सरकारने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक घेतली. ठाणे महापालिका क्षेत्रात करोना चाचण्यांची संख्या कमी असून दिवसाला दोन हजारपर्यंत चाचण्या करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, नागरी आरोग्य केंद्र, रे्लवेस्टेशन्स या ठिकाणीही कोव्हीड चाचण्या सुरू करण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या.
हेही वाचा- ठाणे : आमदाराच्या तोतया बहिणीची कल्याणमध्ये पोलिसांना शिवीगाळ
२४ तासाच्या आत करोना चाचणीचा अहवाल येणे अत्यंत आवश्यक आहे, यामध्ये कोणताही विलंब चालणार नाही यासाठी तीन सत्रामध्ये २४ तास प्रयोगशाळा सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. करोना लसीकरणावर भर देत असतानाच रुग्णालयातील औषधांची उपलब्धतता, प्राणवायुच्या पुरेशा टाक्या, खाटा आदींची तयारी ठेवावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
हेही वाचा-
करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या करोना केंद्रात मुलभूत सेवासुविधांची पाहणी करावी. यामध्ये प्राणवायु, अग्निरोधक यंत्रणा, विद्युतीकरण व पाणीपुरवठा आदी सेवासुविधांची आवश्यकता असल्यास त्याचे काम करून घ्याव्या. त्यामुळे भविष्यात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.